जिल्ह्यातील चित्र; सहकारी, खासगी दूध संघांकडून रोज साडेसात लाख लिटर संकलन
धीरज बरगे कोल्हापूर
दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत दुग्ध व्यवसायाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केंद्र, राज्य सरकारकडून सुरु आहे. पण सहकारी, खासगी दूध संघांनी गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांची कपात केल्याने दूध उत्पादकांमध्ये निराशा आहे. जिल्ह्यात प्रतिदिन सुमारे साडेसात लाख लिटरहून अधिक गाय दूधाचे संकलन होते. त्यानुसार दर कपातीमुळे जिल्ह्यातील दूध उत्पादकांना प्रतिदिन सुमारे 15 लाखांहून अधिक रूपयांचा फटका बसत आहे.
ओल्या चाऱ्याची कमतरता, पशुखाद्याचे वाढलेले दर, बदलत्या वातावरणामुळे जनावरांची दूध देण्याची कमी झालेली क्षमता अशा अनेक समस्यांमधून सध्या दुग्धव्यवसाय जात आहे. या सर्व बाबींमुळे दुग्ध व्यवसाय खर्चिक व तोट्याचा ठरत असल्याने तरुण पिढी या व्यवसायाकडे पाठ फिरवत आहे. परिणामी, जिल्ह्यातील दूध उत्पादनाचा आकडा दिवसेंदिवस घटत आहे. दूध व्यवसायासमोरील आव्हाने पेलण्यासाठी, तरुण पिढीला याकडे पुन्हा आकर्षित करण्यासाठी शासनाने गोठा उभारणीपासून ते जनावरे खरेदीपर्यंत अनुदान देण्यास सुरुवात केली आहे. दूध उत्पादकांसाठी राबवलेल्या अनेक योजनांमुळे दूध व्यवसाय फायदेशीर ठरत असताना राज्यातील सहकारी, खासगी दूध संघांनी गाय दूध खरेदी दरात कपातीचा निर्णय घेतल्याने दूध उत्पादकांमध्ये पुन्हा निरुत्साहाचे वातावरण आहे.
जिल्ह्यात प्रतिदिन 7.66 लाख लिटर संकलन
जिल्ह्यात सहकारी, खासगी दूध संघांच्या माध्यमातून प्रतिदिन 7.66 लाख लिटर दूध संकलन केले जाते. यामध्ये सर्वाधिक दूध संकलन गोकूळ दूध संघाचे आहे. गोकुळकडून प्रतिदिन सुमारे साडेपाच लाख लिटरहून अधिक गायीच्या दुधाचे संकलन केले जाते.
म्हैस दुधाच्या तुलनेत गाय दुधाचे संकलन अधिक
जिल्ह्यातील म्हैस दूधाला राज्यातून मोठी मागणी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील म्हैस दूधाचे उत्पादन वाढवण्यासाठी शासनासह दूध संघांचा प्रयत्न सुरु आहे. मात्र सद्यस्थिती पाहता जिल्ह्यात म्हैस दुधापेक्षा गायीच्या दुधाचे संकलन अधिक आहे. प्रतिदिन म्हैस दुधाचे संकलन साडेसहा लाख लिटर आहे. तर गायीच्या दुधाचे संकलन साडेसात लाख लिटरहून अधिक आहे. एकंदरीत म्हैस दुधाच्या तुलनेत गाय दुधाचे प्रतिदिन संकलन सुमारे एक लाख लिटरहून अधिक आहे.
दिवसाकाठी एकूण 10 लाख लिटर संकलन
जिल्ह्यातील सहकारी खासगी दूध संघांकडून जिल्ह्यासह जिल्हा व राज्याबाहेरुनही गाय, म्हैस दूध संकलन केले जाते. जिल्ह्यात प्रतिदिन जिल्ह्याबाहेरुन 1 लाख 26 हजार 785 लिटर तर राज्याबाहेरुन 1 लाख 14 हजार 484 लिटर दूध संकलन होते. जिल्हा, जिल्हा व राज्याबाहेरुन होणाऱ्या दूध संकलनाची आकडेवारी पाहता जिल्ह्यात दिवसाकाठी गायीच्या दुधाचे सुमारे दहा लाख लिटरहून अधिक संकलन होते.
जिल्ह्यातील गाय दूध संकलनाची आकडेवारी
दूध संघाचे नाव दूध संकलनाची आकडेवारी
जिल्हा जिल्ह्याबाहेरील राज्याबाहेरील एकूण
गोकुळ 5,36,588 67,741 43,753 6,48,082
वारणा 1,64,078 17,363 – 1,81,441
दत्त इंडिया (डिलिशिया) 17,500 16,600 6,200 40,300
मेहता डेअरी 9,400 8,400 45,000 62,800
स्वाभिमानी 17,500 4278 231 22,009
छत्रपती शाहू 6,500 5,400 5,600 17,500
वैजनाथ शिनोळी 4,450 – 1,900 6350
जोतिर्लिंग वाडीचरण 3,200 5,800 – 9000
अन्नपूर्णा व्हनाळी 4,350 – 5300 9650
हरे कृष्ण शिनोळी 250 – 6500 6750
समाधान (थोरातांचे वडगांव) 1800 380 – 2180
शिरोळ तालुका 839 – – 839
हनुमान यळगुड 123 823 – 946
एकूण 7,66,577 1,26,785 1,14,484 10,07847









