राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांचा आरोप
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांना मदत पुरविणे हे सरकारचे प्रथम कार्य आहे. परंतु मंत्री, पालकमंत्री, आमदार पुरग्रस्तांकडे फिरकलेच नाहीत, ही दुर्दैवी बाब आहे. बेळगावचे पालकमंत्री, महिला व बालकल्याण मंत्री या साखर कारखाना व सहकारी संस्थांच्या निवडणुकीत व्यस्थ असल्याने शेतकऱ्यांकडे सरकारचे पूर्णता दुर्लक्ष झाल्याचा आरोप राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला.
जिल्ह्यातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी किमान दोन ते तीन महिन्यातून एकदा केडीपी बैठक घेणे गरजेचे असते. परंतु बेळगावमध्ये मे महिन्यानंतर अद्याप केडीपी बैठक झालेली नाही. कृष्णा नदीच्या पुरामुळे बेळगाव जिल्ह्याला मोठा फटका बसला. परंतु पूरग्रस्तांना राज्य सरकारने कोणतीही मदत दिलेली नाही. सध्या विजापूरमध्ये मोठ्या प्रमाणात पूर असून तेथेही पालकमंत्री फिरकले नसल्याने सरकार किती गांभीर्याने विचार करत आहे हे समजून येत आहे, असे ते म्हणाले.
माजी आमदार संजय पाटील म्हणाले, भाजप सरकारच्या काळात घरे कोसळलेल्यांना 5 लाख रु. निधी दिला जात होता. परंतु सध्याच्या सरकारला शेतकऱ्यांचे गांभीर्य उरलेले नाही. मुख्यंमत्रीपदी येडियुराप्पा असताना पूरस्थितीवेळी आठ ते दहावेळा ते बेळगावमध्ये आले होते. परंतु सध्या आमदारदेखील पूरग्रस्तांकडे फिरकत नसल्याचा आरोप माजी आमदार अनिल बेनके यांनी केला. यावेळी महानगर अध्यक्ष गीता सुतार, हणमंत कोंगाली यासह इतर उपस्थित होते.









