वाढीव घरपट्टी, फाळा कमी केल्याशिवाय घरपट्टी न भरण्याचा ठराव : काकती होळी चौकात ग्रामस्थांची सभा
वार्ताहर/काकती
वाढीव घरपट्टी, फाळा कमी केल्याशिवाय कोणीही घरपट्टी भरु नये, असा ठराव शनिवारी येथील होळी चौक सभामंडपात झालेल्या सभेत झाला. यावेळी वाढीव घरपट्टीबद्दल राज्य सरकारचा निषेध या सभेत करण्यात आला. अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत माजी अध्यक्ष नारायण होळी होते. कार्यक्रमात देवस्थान पंचमंडळाचे सदस्य लक्ष्मण पाटील यांनी पूर्वी एक हजार रुपये घरपट्टी असलेल्यांना सहापट घरपट्टी आकारण्यात आली आहे. गावात मोठ्याप्रमाणात शेतकरी व श्रमजीवी समाज असल्याने कुटुंबाची उपजिवीका चालविणे कठीण आहे, अशी हतबलता व्यक्त केली.
राचय्या महास्वामी, जि. पं. माजी सदस्य बाबुराव पिंगट, सिदराई सोनुलकर, बाबासाहेब देसाई, परशराम धोणजी, अशोक देसाई, परशराम नार्वेकर आदींनी सरकारचा या निर्णयाचा निषेध केला. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळत नाही, ग्रामीण युवकांना रोजगाराच्या संधी नाहीत. युवक रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. ग्रामस्थ आर्थिक अडचणी आहे. परिणामी गावातील समाज भिकेकंगाल झाला आहे, अशा कठीण परिस्थितीत सरकारने वाढीव घरपट्टी ग्रामस्थांवर लादणे म्हणजे चेष्टा करण्यासारखे आहे, असे विचार अनेकांकडून मांडण्यात आले. बैठकीवेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.









