अहिल्या परकाळे,कोल्हापूर
सर्व शिक्षा अभियान अंतर्गत पुर्वी मुली व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गणवेश मिळत होता. यंदा सरसकट सर्वच विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या 2 लाख 7 हजार 209 विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार आहे. शासनाच्या या निर्णयाचे पालकांसह शिक्षकांकडून स्वागत होत आहे. एकही विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहणार नाही, असा निर्धार राज्य सरकारकडून केला आहे. परंतू मे महिना संपत आला तरी गणवेशासंदर्भात जिल्हा शिक्षण विभागाला अद्याप कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे जिल्हा शिक्षण विभागात संभ्रमावस्था आहे.
यापुर्वी शाळेच्या पहिल्या दिवशी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना गणवेश दिले जात होते. संपूर्ण वर्गात मुली आणि मागासवर्गीय मुलांना गणवेश वाटप करताना शिक्षकांनाही अपराध्यासारखे वाटप होते. त्यामुळे शिक्षक संघटनांनी आपल्या मागण्यांच्या आंदोलनावेळी विद्यार्थी हित लक्षात घेवून सरसकट गणवेश वाटप करण्याची मागणी केली होती. बऱ्याच वर्षापासूनची मागणी मान्य करून यंदा सरकारने सरसकट गणवेश देणार असल्याचे जाहीर केले आहे. परंतू जिल्हा शिक्षण विभागाला अद्याप गणवेश वाटपासंदर्भात कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. 15 जून 2023 ला शाळेचे नवीन वर्ष सुरू होतेय. आवघे वीस दिवस राहिले तरी गणवेशासंदर्भात अद्यादेश राज्य सरकारने काढलेला नाही. त्यामुळे शिक्षण विभागात अद्याप संभ्रमावस्था आहे.
गणवेश कोण तयार करणार?
सरसकट गणवेश वाटपाच्या निर्णयानुसार पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची साईज आणि संख्या जिल्हा शिक्षण विभागाने राज्य शासनाला पाठवायची होती. विद्यार्थी संख्या आणि साईज पाहून राज्य सरकार गणवेश तयार करणार की जिल्हा प्रशासनाला गणवेश तयार करण्याच्या सूचना देणार या संदर्भात निर्णय घेणार होते. परंतू अद्याप जिल्हा प्रशासनाला शासनाकडून कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. परिणामी राज्यातील लाखो आणि जिल्ह्यातील जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांचे गणवेश कधी तयार होणार, असा प्रश्न शिक्षण विभागातून विचारला जात आहे.
15 ऑगस्टपर्यंत गणवेश मिळावे
सरसकट सर्वच विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करायचे म्हंटल्यानंतर गणवेश तयार करण्याच्या टेंडरपासून तयारी करावी लागते. राज्य सरकारने केलेल्या घोषणेची अंमलबजावणी करणे अडचणीचे ठरले आहे. शाळा 15 जूनला सुरू होत असल्याने शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश वाटप करणे शक्य नाही. त्यामुळे राज्य सरकारने त्वरीत निर्णय घेवूत किमान 15 ऑगस्टपपर्यंत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करावे.
राजेंद्र कोरे (राज्य सचिव, खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ)
गणवेशाचा कलर अद्याप ठरला नाही
जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना कोणत्या कलरचा गणवेश वाटप केला जाणार आहे. मुलींना निळा आणि पांढरा गणवेश तर मुलांना खाकी आणि पांढरा गणवेश द्यायचा, की अन्य कोणत्या कलरचा गणवेश द्यायचा यासंदर्भात सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही.
खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार का ?
जिल्हा परिषद आणि महापालिका शाळांबरोबर खासगी शाळेतील विद्यार्थ्यांनाही सरकारने मोफत गणवेश वाटप करावा, अशी मागणी शिक्षण क्षेत्रातून होत आहे. तसेच खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा ईशाराही शिक्षकांनी दिला आहे.
की शाळेच्या बँक खात्यावर रक्कम जमा करणार कोल्हापूर जिल्ह्यातील 2 लाख 7 हजार 209 विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचा लाभ होणार आहे. या गणवेशाची सर्वसाधारण नऊ ते दहा कोटी रक्कम होती. ही रक्कम शाळानिहाय विद्यार्थी संख्येनुसार शाळेच्या खात्यावर जमा करणार की काय यासंदर्भातही कोणत्याच सॅचना शासनाकडून दिलेल्या नाहीत.
शासन आदेशाची अंमलबजावणी करणार
महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटपासंदर्भात राज्य शासनाकडून आदेश आल्यानंतर त्या आदेशाची अंमलबजावणी करणार आहे. सरसकट सर्वच विद्यार्थ्यांना गणवेश मिळावा, यासाठी आतोनात प्रयत्न करणार आहे.
शंकर यादव (प्रशासन अधिकारी, महापालिका प्राथमिक शिक्षण समिती)