पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची पत्रकार संवाद कार्यक्रमात माहिती
बेळगाव : शहरात फ्लायओव्हर करण्याचा उद्देश असून यासाठी एक-दोनवेळा प्रयत्नही झाले. आता राज्य सरकारच्या निधीतून याला चालना देण्यात येणार असून संकम हॉटेल ते केएलई स्कूलपर्यंत फ्लायओव्हर करण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी गोकाक येथे जिल्हा हॉस्पिटल निर्माण करण्याची घोषणा केली असून पुढच्या अर्थसंकल्पामध्ये यासाठी निधी दिला जाणार आहे. जिल्हा पोलीसप्रमुखांनीही जिल्ह्यात 500 पोलीस कर्मचारी भरती करण्याची मागणी केली आहे. बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करण्यास कोणतीही अडचण नाही, अशी माहिती पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली. प्रसारमाध्यम विभागाच्या सभागृहात पत्रकार संघाच्यावतीने आयोजित पत्रकार संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार असिफ सेठ उपस्थित होते.
जारकीहोळी पुढे म्हणाले, राज्यातील काँग्रेस सरकारला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली असून या कालावधीत विविध योजना हाती घेण्यात आल्या आहेत. जिल्ह्याला तिसऱ्यांदा सार्वजनिक बांधकाम खाते मिळाले आहे. या खात्याच्याअंतर्गत रस्ते व इमारत बांधकामांना प्राधान्य दिले आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी मोठ्या प्रमाणात निधीही दिला आहे. दोन वर्षांच्या कालावधीत सार्वजनिक खात्याच्या अंतर्गत अंदाजे 13 हजार कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत. कृषी खात्यांतर्गतही शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध उपक्रमांद्वारे कामे करण्यात आली आहेत.
नुकतीच आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी गोकाक येथे जिल्हा हॉस्पिटल निर्माण करण्याची घोषणा केली असून पुढच्या अर्थसंकल्पामध्ये यासाठी निधी दिला जाणार आहे. जिल्ह्यात नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे निर्माण करण्यात येणार आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात सौंदत्ती, रामदुर्ग व अथणीमध्ये 100 बेडचे सरकारी हॉस्पिटल निर्माण करण्याची घोषणा केली होती. याला चालना देण्यात येणार आहे. जिल्ह्यात 257 नूतन अंगणवाडी इमारती बांधण्यात येणार आहेत. तसेच जिल्ह्यात इंदिरा कॅन्टीनची संख्याही वाढविण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
शहरातील जिल्हा क्रीडांगणालाही पूर्णरूप देण्यात येणार आहे. रेल्वे व रिंगरोडसाठीचे भूमीअधिग्रहण अंतिम टप्प्यात आले असून लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. शहरात फ्लायओव्हर करण्याचा उद्देश असून एक-दोनवेळा यासाठी प्रयत्नही झाले. आता राज्य सरकारच्या निधीतून याला चालना देण्यात येणार असून संकम हॉटेल ते केएलई स्कूलपर्यंत फ्लायओव्हर करण्यात येणार आहे. याचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. गोवा-चोर्ला महामार्गासाठी अनेक समस्या उद्भवल्या होत्या. यामुळे प्रवाशांची हेळसांड होत होती. मात्र 50 कोटींहून अधिक निधी उपलब्ध करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या संयोगातून महामार्ग पूर्णत्वास आला आहे, असेही त्यांनी सांगितले.
बेळगाव जिल्ह्यातील तलाव भरण्यासाठी मलप्रभा, घटप्रभा, कृष्णा नदीच्या पाण्याचा वापर करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे रायबाग येथील 18 तलाव भरण्यात येणार असून महिन्याभरात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. जिल्हा पोलीसप्रमुखांनीही जिल्ह्यात 500 पोलीस कर्मचारी भरती करण्याची मागणी केली असून राज्यात पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यास सरकार पावले उचलणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बेळगाव शहरात रस्ते व गटारी निर्माणासाठी महापालिकेमार्फत 100 कोटी रुपये निधीची मागणी करण्यात आली आहे. बळ्ळारी नाल्यासाठी काही तांत्रिक अडचणी येत आहेत. मात्र यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. जिल्ह्यात दोन शैक्षणिक जिल्हे कार्यरत आहेत. 5 कोटी रुपयांच्या निधीतून शैक्षणिक जिल्हे वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हा विभाजनास अडचण नाही
बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करण्यास कोणतीही अडचण नाही. यापूर्वीही राज्यात एका जिल्ह्याचे विभाजन करून तीन जिल्हे करण्यात आले आहेत. त्यामुळे बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनाला कोणतीही अडचण नाही. बेळगावातही 6 मतदारसंघांचे विभाजन करून तीन जिल्हे करण्यात येऊ शकतात. अनेक वर्षांपासून बेळगाव जिल्हा विभाजनाची मागणी करण्यात येत आहे. पण राज्य सरकारकडून अद्यापही विभाजनाची घोषणा करण्यात आलेली नाही, असे जारकीहोळी म्हणाले.









