माजी आमदार संजय पाटील यांचा आरोप
बेळगाव : राज्यात घोटाळ्यांवर घोटाळे होत असताना सत्तेतील काँग्रेस सरकार कोणत्या आधारावर साधना अधिवेशन भरविण्याचा विचार करीत आहे? हा आध्यात्मिक मेळावा नसून संपत्ती मिळविण्यासाठीचा मेळावा आहे. राज्यात हनीट्रॅप, राज्यकर्त्यांच्या जाचामुळे अधिकाऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याचा आरोप माजी आमदार संजय पाटील यांनी केला. सोमवारी भाजपच्यावतीने शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, मागील दोन वर्षात सत्तेत आलेल्या काँग्रेसला काहीही साध्य करता आलेले नाही. केवळ वैयक्तिक संपत्ती जमविण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. कर्नाटकाच्या इतिहासात पहिल्यांदाच स्वत: मंत्र्यांनी आपल्यावर हनीट्रॅप झाल्याचा आरोप केला होता. घोटाळे, अधिकाऱ्यांच्या आत्महत्या, वाढती महागाई, त्यामुळे सामान्य लोकांचे जीवन धोक्यात आले आहे. काँग्रेसला सत्ता दिल्याबद्दल राज्यातील नागरिकांना पश्चाताप होत असल्याचा घाणघात त्यांनी केला. बेळगाव तहसीलदार कार्यालयातील एका अधिकाऱ्याने आत्महत्या केली. त्या प्रकरणाचा आजही छडा लागलेला नाही. तसेच संतिबस्तवाड येथे धर्मग्रंथ जाळल्याचे प्रकरण ताजे आहे. यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. त्यामुळे काँग्रेसला साधना अधिवेशन घेण्याचा कोणताच नैतिक अधिकार नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, महानगर अध्यक्ष गीता सुतार, नगरसेवक हणमंत कोंगाळी यासह इतर सदस्य उपस्थित होते.









