आमदार महेश टेंगीनकाई यांचा आरोप
बेळगाव : हिंदूंच्या धार्मिक उत्सवांवर हल्ले वाढले आहेत. मंड्या येथे गणेश विसर्जनावेळी झालेल्या दगडफेकीत आठजण जखमी झाले. राज्य सरकारकडून अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणाचा प्रयत्न सुरू असल्यामुळे हिंदू धर्मियांवरील हल्ले वाढले आहेत. त्याचबरोबर देशविघातक कारवाया वाढल्या असून राज्यसरकारचे अपयश असल्याचा आरोप हुबळी धारवाडचे आमदार महेश टेंगीनकाई यांनी केला. बुधवारी पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. कोलार येथे पॅलेस्टाईन देशाचा ध्वज ईद ए मिलाद मिरवणुकीमध्ये फडकविला. चित्रदुर्ग, दावणगेरी येथेही अशा प्रकारचे ध्वज दिसून आले. हुबळी येथे पोलिसांच्या वाहनांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. शिमोगा येथे औरंगजेब व टिपू सुलतानचे बॅनर लावण्यात आले. त्याचबरोबर राज्याच्या इतर ठिकाणीही पाकिस्तान झिंदाबादचे नारे देण्यात आले. या सर्व घटनांमुळे राज्यातील वातावरण बिघडल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी भाजप नेते एम. बी. जिरली, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, महानगर अध्यक्ष गीता सुतार, संदीप देशपांडे, राजशेखर डोणी, सचिन काडी, हणमंत कोंगाली यासह इतर उपस्थित होते.









