एच. डी. देवेगौडा यांचा आदेश : कुमारस्वामी निजदचे हंगामी प्रदेशाध्यक्ष
बेंगळूर : निजदचे प्रदेशाध्यक्ष सी. एम. इब्राहिम यांनी भाजप-निजद युतीला श•t ठोकल्यानंतर माजी पंतप्रधान आणि निजदचे राष्ट्रीय अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांनी गुरुवारी निजदची राज्य कार्यकारिणी समिती विसर्जित केली आहे. तसेच माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना पक्षाचे हंगामी प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे. निजदच्या नियमावलीनुसार म्हणजेच आर्टीकल 10 नुसार कर्नाटक प्रदेश निधर्मी जनता दलाची कार्यकारिणी तत्काळ विसर्जित करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे पक्षाचे कामकाज सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी हंगामी प्रदेशाध्यक्षपदी एच. डी. कुमारस्वामी यांची नेमणूक केली जात आहे, असे देवेगौडांनी पत्रकाद्वारे सांगितले आहे.
भाजप-निजद युतीला सी. एम. इब्राहिम यांनी विरोध करत थेट देवेगौडा आणि कुमारस्वामी यांच्याविरुद्ध भूमिका घेतली होती. आपलाच पक्ष ओरिजनल, असे त्यांनी ठामपणे सांगितले होते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी काही नेत्यांनी केली होती. त्यामुळे गुरुवारी देवेगौडा यांच्या नेतृत्त्वाखाली निजदच्या प्रमुख नेत्यांची बेंगळुरात बैठक घेण्यात आली. यावेळी देवेगौडांनी राज्य कार्यकारिणी विसर्जित केली. परिणामी सी. एम. इब्राहिम यांना प्रदेशाध्यक्षपद गमवावे लागले आहे. बैठकीत निजदच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष जी. टी. देवेगौडा, माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, माजी मंत्री बंडेप्पा कोशमपूर, अलकोड हनुमंतप्पा, वेंकटराव नाडगौडा, कोअर कमिटीचे संचालक वाय. एस. व्ही. दत्ता, विधानपरिषद सदस्य टी. ए. शरवण, निजदचे बेंगळूर शहर अध्यक्ष एच. एम. रमेश यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
निवडणूक आयोगाकडे आक्षेप
निजदचे वरिष्ठ नेते एच. डी. देवेगौडा यांना ‘पुत्रमोह’ असल्याचे सिद्ध झाले आहे. आपल्याला डिवचण्यात आले आहे. याचे परिणाम पुढे दिसून येतील. निजद नेत्यांना आपल्याला प्रदेशाध्यक्षपदावरून हटविण्याचा अधिकार नाही. कार्यकारिणी समितीच्या दोन तृतीयांश सदस्यांची परवानगी घेऊन आपल्याला आधी नोटीस द्यावी लागते. मी निवडणूक आयोगाकडे निजदश्रेष्ठींच्या निर्णयावर आक्षेप घेईन. वेळ येताच आमदारांची बैठक घेईन. लालूप्रसाद यादव, केजरीवाल, नितीशकुमार हे माझ्या संपर्कात आहे. काँग्रेसमध्ये घरवापसीचा निर्णय घेतलेला नाही, असे सी. एम. इब्राहिम यांनी सांगितले.









