अंतिम आरक्षण 2 डिसेंबरला प्रसिद्ध होणार
सोलापूर : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील महापालिका (बृहन्मुंबई वगळून) निवडणुकांच्या अनुषंगाने आरक्षण प्रक्रियेचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार प्रारूप आरक्षण, हरकती, सूचनांबर विचार आणि अंतिम आरक्षण जाहीर करण्याच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी येत्या ११ नोव्हेंबर रोजी प्रभाग आरक्षण सोडत करण्यात येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार, आरक्षित जागांची संख्या निश्चित करून त्याचा प्रस्ताव आयोगाकडे सादर करण्याची मुदत ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०२५ अशी आहे. त्यानंतर ८ नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडतीची जाहीर सूचना प्रसिद्ध होणार असून, ११ नोव्हेंबर रोजी सोडती निघून ती आयोगाकडे सादर केली जाणार आहे.
यानंतर १७ नोव्हेंबर रोजी प्रारूप आरक्षण, हरकती व सूचना मागविण्याची प्रक्रिया सुरू होईल. या प्रक्रियेचा शेवटचा दिवस २४ नोव्हेंबर २०२५ आहे. हरकती आणि सूचनांवर विचार करून २५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२५ दरम्यान संबंधित महानगरपालिकेचे आयुक्त निर्णय घेतील. शेवटी, २ डिसेंबर २०२५ रोजी राज्य शासनाच्या वतीने अंतिम आरक्षण अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे. असे राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी आदेशात म्हटले आहे. राज्यभरातील महापालिका निवडणुकांसाठी ही प्रक्रिया पार पडणार असून, निवडणुकीच्या तयारीसाठी स्थानिक प्रशासन यानुसार आवश्यक तयारी सुरू करणार आहे.








