मुख्यमंत्री बोम्माई यांची माहिती : जानेवारीपासून पूर्वतयारी
प्रतिनिधी/ बेंगळूर
फेब्रुवारी महिन्यात राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. यासंबंधी अर्थखात्याच्या अधिकाऱ्यांची दोन टप्प्यात चर्चा झाली आहे. बेळगावमधील अधिवेशन संपल्यानंतर सर्व खाते, संस्था प्रमुखांची बैठक घेऊन चर्चा करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिली.
हावेरी जिह्यातील शिग्गाव येथे शनिवारी पत्रकारांशी ते बोलत होते. जानेवारी महिन्यापासून अर्थसंकल्पाची पूर्वतयारी करण्यात येईल. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.
राज्यात एप्रिल-मे मध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार फेब्रुवारीमध्ये अर्थसंकल्प सादर करणार आहे. निवडणुकीचे वर्ष असल्याने मतदारांना खूष करण्यासाठी अर्थसंकल्पात विविध योजनांची खैरात करण्यात येण्याची शक्यता आहे.









