वाढीसह नफा 16,891 कोटी रुपयांच्या घरात: एकूण उत्पन्न 15 टक्क्यांनी वधारले
वृत्तसंस्था/मुंबई
देशातील सर्वात मोठी सरकारी मालकीची बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने 2024-25 च्या तिसऱ्या तिमाहीत 16,891.44 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा नोंदवला. वर्षाच्या आधारावर तो 84.32 टक्क्यांनी वाढला आहे. एका वर्षापूर्वी म्हणजेच 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीत बँकेचा नफा 9163.96 कोटी रुपये होता. बँकेच्या एकूण उत्पन्नात 15.13 टक्के वाढ झाली ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत बँकेचे एकूण उत्पन्न वार्षिक आधारावर 8.69 टक्क्यांनी वाढून 1,28,467.39 कोटी रुपये झाले. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत ते 1,18,192.68 कोटी रुपये होते.
निव्वळ व्याज उत्पन्न 4 टक्क्यांने वाढले
ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत, एसबीआयचे निव्वळ व्याज उत्पन्न (एनआयआय) वार्षिक आधारावर 4 टक्क्यांनी वाढून 41,445.51 कोटी रुपये झाले. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत ते 39,815.73 कोटी रुपये होते. जुलै-सप्टेंबर तिमाहीत ते 41,619.54 कोटी रुपये होते. तिमाही आधारावर कोणताही मोठा बदल झालेला नाही. एसबीआयमध्ये सरकारची 57.59 टक्के हिस्सेदारी आहे. बँकेची स्थापना 1 जुलै 1955 रोजी झाली. बँकेचे मुख्यालय मुंबईत आहे. बँकेच्या 22,500 हून अधिक शाखा आणि 50 कोटींहून अधिक ग्राहक आहेत. ही बँक जगातील 29 देशांमध्ये कार्यरत आहे. भारताबाहेर तिच्या 241 शाखा आहेत.
स्टँडअलोन आणि कन्सोलिडेटेड ?
कंपन्यांचे निकाल दोन भागात येतात-स्टँडअलोन आणि कन्सोलिडेटेड. स्टँडअलोन फक्त एकाच विभागाची किंवा युनिटची आर्थिक कामगिरी दर्शवते. तर, कन्सोलिडेटेड आर्थिक अहवालात, संपूर्ण कंपनीचा अहवाल दिला जातो.









