नफा 178 टक्क्यांच्या वाढीसोबत 16884 कोटींच्या घरात
वृत्तसंस्था / मुंबई:
भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने शुक्रवारी जून तिमाहीचा निकाल जाहीर केला. यामध्ये बँकेचा चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतला निव्वळ नफा वार्षिक आधारावर 178.24 टक्क्यांनी वाढून 16,884 कोटी रुपये झाला आहे. अंदाजापेक्षा बँकेचे तिमाही निकाल अधिक चांगले आले आहेत.
आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत, एसबीआयचे निव्वळ व्याज उत्पन्न 24.7 टक्क्यांच्या वाढीसह 38,905 कोटी रुपये होते. जून तिमाहीत, बँकेचा एकूण एनपीए एकूण कर्जाच्या 2.76 टक्क्यांवर आला. मागील तिमाहीत बँकेचा एकूण एनपीए एकूण कर्जाच्या 2.78 टक्के होता. गेल्या वर्षी जून तिमाहीत बँकेचा एकूण एनपीए एकूण कर्जाच्या 3.9 टक्के होता.
जून तिमाहीत बँकेने केलेली तरतूद 2,501 कोटी रुपयांपर्यंत खाली आली आहे. गेल्या वर्षी जून तिमाहीत हा आकडा 4,392 कोटी रुपये होता. त्याचप्रमाणे मार्च तिमाहीअखेर बँकेने 3,316 कोटी रुपयांची तरतूद केली होती.
समभागावर परिणाम
तिमाही निकाल जाहीर झाल्यानंतर एसबीआयच्या समभागांना ब्रेक लागला. बँकेचा समभाग शुक्रवारी 2.17 टक्क्यांनी घसरून 577.70 रुपयांवर आला. मागील सत्रात या समभागाची किंमत 590.50 रुपयांच्या पातळीवर होती.
गेल्या पाच दिवसांत हा समभाग 6.69 टक्क्यांनी घसरला आहे. त्याचप्रमाणे गेल्या एका महिन्यात या समभागामध्ये 2.49 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे.









