85 वारकऱ्यांचा सहभाग ; 26 रोजी पंढरपूरात होणार दाखल
डिचोली : मुळगाव येथील केळबाई सातेरी वारकरी मंडळातर्फे आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या पायी वारीला बुधवार दि. 14 जून रोजी सकाळी मुळगाव येथून प्रारंभ झाला. या पायी वारीत एकूण 85 वारकऱ्यांचा सहभाग असून ही वारी 26 जून रोजी पंढरपूरात दाखल होणार आहे. केळबाई सातेरी वारकरी मंडळाच्या वारकऱ्यांनी विठ्ठल नामाचा गजर करत वातावरण भक्तीमय केले. जय जय पांडुरंग हरीच्या गजरात वारी मुळगाव येथून निघाली. डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो यांनी उपस्थित राहून वारीला निरोप दिला. वारीत सहभागी होऊन विठ्ठल नामाचा गजर करीत चालणे हे सर्वात मोठे दैवी कार्य आहे. वारीत सहभागी वारक्रयांनी आपल्या आरोग्याचीही काळजी घ्यावी. असे आवाहन आमदार डॉ. शेट्यो यांनी केले. वारी ह.भ.प. सुनीलबुवा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करीत आहे. यावेळी वारकरी वसंत गाड, पांडुरंग परब, धनंजय पळ, सुरेश शेटकर, दयानंद राऊत, आनिल परब, हरिश्चंद्र परब, उदय परब ,सत्यवान राऊत, नरेश परब व इतर वारकरी उपस्थित होते.
श्री संदीपक शिक्षण संस्थेच्या मुलांनी घेतले दर्शन
वारी पायी चालत जाताना कासरपाल येथे श्री संदीपक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार नरेश सावळ व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी वारीचे दर्शन घेतले. श्री विठ्ठल रखुमाईंचे आशिर्वाद घेत विद्यार्थ्यांना वारीचे महत्त्व सांगितले. पंढरपूरच्या वारीला अनन्यसाधारण महत्त्व असून देवाच्या भक्तीबरोबरच आरोग्यासाठी ही वारी उपयुक्त आहे, असे नरेश सावळ यांनी सांगितले.









