बेळगाव बस आगाराने त्वरित दखल घेण्याची प्रवाशांची मागणी : राकसकोप बस तुडयेपर्यंत सोडण्याची मागणी
वार्ताहर/तुडये
बेळगाव डेपोने तुडये गावासाठी बससेवा सुरू करावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. चंदगड तालुक्याच्या शेवटच्या टोकाला वसलेल्या तुडये परिसराचा सर्वात जादा संपर्क हा बेळगाव शहराशी आहे. येथील शेतकऱ्यांनी पिकवलेला रताळी असो वा भाजीपाला असो तो विक्रीसाठी बेळगाव बाजारपेठेत पाठवतात. हा परिसर महाराष्ट्र राज्यात असला तरी संपूर्ण व्यवहार मात्र बेळगावातच होतात. त्यामुळे सीबीटी ते तुडये अशी बससेवा सुरू होण्याची गरज आहे.
बससेवा 20 वर्षांपासून बंद
कित्तूर चन्नम्मा ते तुडये अशी बससेवा 1980 सालापासून सुरू होती. त्यापूर्वी येथील ग्रामस्थांना तीन किलोमिटर अंतर पायपीट करत राकसकोप गावी जावे लागत होते. तुडये येथील प्रवाशांची संख्या जादा असल्याने राज्य परिवहन मंडळालाही फायदेशीर ठरले होते. सरोळी, हजगोळी, सुरुते या गावांनाही बेळगावहून बससेवा सुरू होती. तुडये-हजगोळी गावासाठी सकाळी बेळगावहून 7.30 वा., 11.30 वा., दुपारी 1.30, सायंकाळी 6 आणि रात्री 8.15 वा. मुक्कामची गाडी अशा केवळ पाच फेऱ्या होत्या. 1996 सालापासून या मार्गांवर प्रवासी टेम्पोची स्पर्धा सुरू आहे. अर्ध्या तासाला टेम्पोसेवा सुरू झाल्याने ताटकळत बसची वाट पाहणारे प्रवासी टेम्पोने प्रवास करू लागले. परिवहन मंडळाच्या बसेस रिकामी फिरू लागल्याने परिवहन मंडळाने 2005 सालापासून या परिसातील बससेवाच बंद केली.
आता केवळ परिसराला तीन फेऱ्या
या परिसराला सकाळी 8 वाजता व सायंकाळी 5 वाजता बेळगाव येथून सुटणारी धामणे (एस.) ता. बेळगावला जाणारी विद्यार्थ्यांसाठी दोन फेऱ्या व रात्री 8.30 वाजता सुटणारी तुडये मुक्काम गाडी अशा तीन फेऱ्या आहेत. यापैकी धामणे (एस.) फेऱ्यांबाबत ड्रायव्हर कंडक्टरची मनमानीमुळे राकसकोप येथूनच परत नेणे, रविवारी फेऱ्या रद्द करणे नित्याचे ठरले आहे. राकसकोपला सध्या सुरू असलेल्या सर्व बसफेऱ्या तीन किलोमीटर अंतरावरील तुडये गावापर्यंत सोडाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. डेपो मॅनेजरनी सर्व फेऱ्या तुडयेपर्यंत सोडाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.









