पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांची सूचना
► प्रतिनिधी/ बेळगाव
शिवजयंती उत्सव मिरवणूक वेळेत सुरू करण्याची सूचना पोलीस अधिकाऱ्यांनी केली आहे. शनिवारी सायंकाळी मार्केट पोलीस स्थानकात झालेल्या सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. पदाधिकाऱ्यांनीही आपल्या अडचणी सांगितल्या आहेत.
गुन्हे तपास विभागाचे एसीपी सदाशिव कट्टीमनी, मार्केटचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णवर यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत रणजित चव्हाण-पाटील, सुनील जाधव, मेघन लंगरकांडे, आनंद आपटेकर यांच्यासह अनेक मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
चित्ररथ मिरवणूक व सजीव देखावे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात शिवभक्त बेळगावला येतात. त्यामुळे मिरवणूक वेळेत सुरू करावी, कर्कश आवाजाच्या डीजेला फाटा द्यावा, एखादे मंडळ सजीव देखावा सादर करत असेल तर त्यांना त्रास होऊ नये याची इतर मंडळांनी काळजी घ्यावी, मिरवणूक शांततेत व उत्साहात पार पाडण्यासाठी मंडळांनी सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केले.









