वयात सवलत देण्याची मागणी : माजी सैनिक संघटनेचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
भारतीय लष्कर भरती गेल्या दोन वर्षांपासून पूर्णपणे ठप्प झाली आहे. कोरोनामुळे ही भरती थांबविण्यात आली होती. त्यामुळे भरती होणाऱया तरुणांना समस्या निर्माण झाली आहे. त्यांचे वय वाढले आहे तेंव्हा वयामध्ये सवलत द्यावी. याचबरोबर शारीरिक आणि वैद्यकीय चाचणीमध्ये यशस्वी झालेल्या तरुणांची लेखी परीक्षा घेऊन त्यांना लष्करात सामावून घ्यावे यासह इतर मागण्यांसाठी माजी सैनिक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले.
भारतीय सैन्यामध्ये तरुणांना सामावून घेण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून भरती प्रक्रिया घेण्यात आली नाही. 4 जानेवारी 2021 ते 15 जानेवारी 2021 या काळात भरतीसाठी तरुणांची शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी घेण्यात आली होती. मात्र दोन वर्षे उलटली तरी अद्याप त्यांची लेखी परीक्षा घेतली नाही. त्यामुळे अनेक तरुणांचे वय वाढल्यामुळे त्यांच्यावर अन्याय होणार आहे. तेंव्हा त्याचाही गांभीर्याने विचार करून तातडीने लेखी परीक्षा घेवून त्या सर्व विद्यार्थ्यांना लष्करामध्ये सामावून घ्यावे, असेही या निवेदनात म्हटले आहे.
तातडीने लष्कर भरती प्रक्रिया सुरू करावी. अनेक तरुण लष्करामध्ये सेवा बजावण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र भरती प्रक्रिया नसल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. तेंव्हा केंद्र सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि तरुणांना देशसेवा करण्यासाठी संधी द्यावी, असे या निवेदनात म्हटले आहे. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अध्यक्ष बसाप्पा तळवार, उपाध्यक्ष विरुपाक्ष तिळगंजी, शिवमल्लाप्पा कुळली, रायाप्पा बन्नकगोळ, एम. बी. शिगुनशी, रमेश चौगुला, संतोष हिरेमठ यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.









