आरोग्य स्थायी समिती बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना
बेळगाव : जन्म व मृत्यू दाखले वितरण सुलभ व्हावे, यासाठी दक्षिण आणि उत्तर दोन्ही मतदारसंघात स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी, अशी सूचना मंगळवारी पार पडलेल्या आरोग्य स्थायी समिती बैठकीत अध्यक्ष श्रीशैल कांबळे यांनी आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांना केली. जन्म व मृत्यू दाखले मिळविण्यासाठी शहरातील नागरिकांना महापालिकेच्या मुख्य कार्यालयाकडे यावे लागते. त्यामुळे वेळ वाया जाण्यासह लोकांचे हेलपाटे होत आहेत. त्यामुळे दक्षिण आणि उत्तर भागासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी, अशी सूचना बैठकीत करण्यात आली. त्यावेळी आरोग्याधिकारी डॉ. नांद्रे म्हणाले, प्रशासन उपायुक्त उदयकुमार तळवार यांच्या सूचनेवरून महसूल विभागाने तयार केलेल्या झोनल कार्यालयात अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यावर आरोग्य विभागाचे प्रमुख तुम्ही आहात की, प्रशासन उपायुक्त? असा सवाल त्यांना विचारण्यात आला. झोनल कार्यालयांमध्ये अर्ज स्वीकारण्याऐवजी दक्षिणसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी, असे सांगण्यात आले.
सध्या जन्म व मृत्यू दाखले देण्यासाठी एकच ‘की’ असून यासाठी दुसरी ‘की’ तयार करावी लागणार असल्याचे आरोग्याधिकाऱ्यांनी सांगितले. यावर तातडीने कार्यवाही करून हा प्रश्न निकालात काढावा. तातडीने विभागीय कार्यालयाचे लोकार्पण केले जाईल, असे अध्यक्ष श्रीशैल कांबळे यांनी सांगितले. शहरात प्लास्टिकची समस्या गंभीर बनली आहे. त्यामुळे प्लास्टिकची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून प्लास्टिक जप्त करण्यात यावे, नागरिकांमध्ये जागृती व्हावी, यासाठी अधिकाऱ्यांनी स्वत:पासूनच सुरुवात केली पाहिजे. घरातून खरेदीसाठी बाहेर पडताना हातात कापडी पिशवीच घ्यावी. त्यामुळे कापडी पिशवी वापरण्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचेल, असे महापौर मंगेश पवार यांनी सूचित केले. त्यावर प्लास्टिकची विक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाई करून 4 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सांगितली.









