वृत्तसंस्था / बँकॉक
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या थॉमस आणि उबेर चषक आंतरराष्ट्रीय पुरूष आणि महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेला रविवारी येथे प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत पीव्ही सिंधू आणि लक्ष्य सेन या भारतीय बॅडमिंटनपटूंकडून पदकांची अपेक्षा बाळगली जात आहे.
पुरूषांच्या विभागातील थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेत आतापर्यंत भारताच्या एकाही बॅडमिंटनपटूला पदक मिळविता आलेले नाही. त्याचप्रमाणे एकदाही या स्पर्धेच्या इतिहासात भारतीय पुरूष बॅडमिंटनपटूला उपांत्य फेरीपर्यंत मजल मारता आलेली नाही. उबेर चषकासाठी महिलांच्या विभागात भारतीय महिला बॅडमिंटनपटूंनी यापूर्वी झालेल्या सलग दोन स्पर्धांमध्ये उपांत्य फेरी गाठली. त्यांना उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागल्याने 2014 आणि 2016 साली दोन कास्यपदके मिळाली. गेल्यावर्षी या स्पर्धेत पुरूष आणि महिला विभागात भारताचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच समाप्त झाले होते.
यावेळी या स्पर्धेसाठी भारताने अव्वल पुरूष स्पर्धकांना उतरविले आहे. नववा मानांकित लक्ष्य सेन, अकरावा मानांकित किदांबी श्रीकांत, एच.एस. प्रणॉय हे एकेरीत भारताचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. दुहेरीमध्ये सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी तसेच एम.आर. अर्जुन व धृव कपिला त्याचप्रमाणे कृष्णप्रसाद गरेगा आणि विष्णुवर्धन गौड या भारतीय जोडय़ांचा समवेश राहील. दुहेरीमध्ये भारतीय स्पर्धकांना पदकांची संधी असून भारताचा सलामीचा सामना ब गटातील जर्मनीविरुद्ध होणार आहे. या गटात चीन तैपेई व कॅनडा यांचाही सहभाग आहे.
महिलांच्या दुहेरीमध्ये तनिषा क्रेस्टो, श्रृती मिश्रा, सिमरन सिंगी, रूतिका ठक्कर आणि ट्रेसा जॉली भारताचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. दुखापतीमुळे भारताच्या एन सिक्की रेड्डी आणि अश्विनी पोनप्पा तसेच गायत्री गोपीचंद यांनी या स्पर्धेतून माघार घेतली आहे. महिला एकेरीत पी.व्ही. सिंधू तसेच आकर्षी कश्यप व उनाती हुडा यांचा सहभाग राहील. भारतीय पुरूष स्पर्धकांना पदकांसाठी कडवी लढत द्यावी लागणार आहे. पुरूष विभागात एकूण 16 संघांचा समावेश असून ते चार गटात विभागण्यात आले आहेत. थॉमस चषक स्पर्धेत माजी विजेता इंडोनेशिया हा सर्वात आतापर्यंतचा यशस्वी संघ म्हणून ओळखला जातो. त्यांनी 14 वेळा अजिंक्यपद मिळविले असून महिलांच्या उबेर चषकांवर चीनने आतापर्यंत 15 वेळा आपले नाव कोरले आहे.









