पावसाअभावी उत्पादनात घट : पिंजराचीही चिंता
बेळगाव : यंदा म्हणावा तसा पाऊस न झाल्याने पिकांना मोठा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत उरलंसुरलं धान्य पदरात पाडवून घेण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. माळरानावरील भात कापणीला शेतकऱ्यांनी प्रारंभ केला आहे. पावसाअभावी माळरानावरील पिकांना मोठा फटका बसला आहे. मात्र यातूनही उरलंसुरलं पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांचा खटाटोप सुरू आहे. पश्चिम भागातील कुद्रेमनी, बाची, तुरमुरी, कोनेवाडी, बेळगुंदी, बेळवट्टी, बडस, चलवेनहट्टी, बेकिनकेरे, अतिवाड, कडोली, केदनूर, मण्णिकेरी, हंदिगनूर, म्हाळेनट्टी आदी भागात माळरानावरील भात कापणीला सुरुवात झाली आहे. मात्र पावसाअभावी केवळ भातपीक व्यवस्थित नसल्याने उत्पादन कमी होणार आहे.
यंदा जुलैअखेर वगळता समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे भात, ऊस, बटाटा, रताळी, सोयाबिन, भुईमूग आदी पिकांना फटका बसला आहे. विशेषत: माळरानावरील पिके करपून गेली आहेत. पाण्याची व्यवस्था असलेल्या ठिकाणी पाणीपुरवठा केला आहे. त्या ठिकाणी भाताची सुरळीत पोसवणी झाली. मात्र पाण्याची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी भात पोसवणी झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे. परिणामी भात आणि सुका चारा म्हणजेच पिंजराचे दर वाढण्याची चिंता व्यक्त होत आहे. तालुक्यात भातशेतीचे क्षेत्र सर्वाधिक आहे. मात्र यंदा पाऊस नसल्याने पिकाला फटका बसला आहे. त्यामुळे काहींना खायलादेखील धान्य मिळणार नसल्याची चिंता व्यक्त होत आहे.









