कणकुंबी येथे विश्व नदी दिवसानिमित्त उपक्रम : बेळगाव, गोवा, धारवाड, हुबळीतील पर्यावरणप्रेमी-निसर्गप्रेमींचा सहभाग
वार्ताहर /कणकुंबी
पृथ्वीवरील सर्व प्राणीमात्रांना तसेच सर्व जीवसृष्टीला पाण्याची नितांत गरज आहे. पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण भरपूर असले तरी पिण्यासाठी पाणी फार कमी आहे. पृथ्वीचा दोन टक्के भूभाग आणि तीन टक्के पाण्याचा भाग तर जागतिक लोकसंख्येपैकी 19 टक्के लोकसंख्येचा भाग भारताने व्यापलेला आहे. भविष्यात सर्व प्राणीमात्रांना पाण्याची समस्या भेडसावणार आहे. त्यासाठी नदी, नाले यांची स्वच्छता राखून पाण्याचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. मलप्रभा नदीच्या कणकुंबी येथील उगमस्थानापासून ते कुडलसंगमपर्यंत मलप्रभा नदी संरक्षण अभियान हाती घेण्यात आलेले आहे.मलप्रभा नदीचे पाणी स्वच्छ राखण्यासाठी व नदी प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी सर्व निसर्गप्रेमींनी व सर्वांनी या उपक्रमात सहभागी होणे गरजेचे आहे, असे मत धारवाड विद्यापीठाचे निवृत्त प्राचार्य डॉ. राजेंद्र पोतदार यांनी व्यक्त केले. कणकुंबी येथे मलप्रभा नदीच्या उगमस्थानावर विश्व नदी दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या मलप्रभा नदी संरक्षण अभियानाचा शुभारंभ करताना ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव जिह्याचे पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा उपस्थित होते. प्रारंभी कणकुंबी येथील श्री माउलीदेवी मंदिर परिसरापासून नदी संरक्षण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
‘जल है तो कल है’ च्या घोषणा
बेळगाव पर्यावरण संघटना, सह्याद्री संरक्षण अभियान व निसर्गप्रेमी यांच्यावतीने मलप्रभा नदीचे संरक्षण आणि संवर्धनाची मोहीम हाती घेण्यात आली. प्रारंभी माउली देवीचे दर्शन घेऊन उगमस्थळापर्यंत चालत जाऊन जलदेवतेचे पूजन करण्यात आले. त्या ठिकाणी ‘जल है तो कल है’ अशा घोषणा देऊन या अभियानाला सुऊवात करण्यात आली. त्यानंतर विश्व नदी दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पॅ. नितीन धोंड होते. प्रारंभी पर्यावरणप्रेमी नायला कोयला यांनी मलप्रभा संवर्धन अभियानातर्फे उपस्थितांचे स्वागत करून मलप्रभा नदीचे संरक्षण, संवर्धन आणि बचाव या उपक्रमाबद्दल माहिती देण्यात आली. भविष्यात मलप्रभा नदीच्या संरक्षणासाठी व बचावासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून संवर्धनाचे कार्य हाती घेण्यात येणार आहे. लेफ्टनंट जनरल कै. सरदेशपांडे सह्याद्री वनसंवर्धन अभ्यास केंद्र उचवडे आणि पर्यावरणप्रेमी बेळगाव या संघटनेच्या माध्यमातून आज मलप्रभा नदी संवर्धनाची मोहीम हाती घेण्यात आली.
पोलीस आयुक्तांकडून अभिनंदन
यावेळी पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांनी देखील पाण्याचे महत्त्व पटवून देऊन विश्व नदी दिवस साजरा करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या सर्वांचे अभिनंदन केले. प्रत्येकाने पाण्याचे संरक्षण करण्यावर भर देण्याचे सांगितले. यावेळी हुबळीचे निवृत्त कमांडर अरविंद शिग्गाव, कॅ. नितीन धोंड, जीएसएस कॉलेजचे निवृत्त प्राचार्य श्रीकृष्ण प्रभू व हेमांगी प्रभू, जेईएसएसचए प्रा. अश्वीन, धारवाडचे सुरेश कुलकर्णी, हिडकल डॅमचे व्ही. एस. मुदनूर, गोव्याच्या पर्यावरणप्रेमी व निवृत्त प्राध्यापिका अंजली चितळे, शिवप्रतिष्ठानचे कर्नाटक राज्यप्रमुख किरण गावडे, सुनील चिगुळकर, ग्रा. पं. अध्यक्षा दिव्या गवस व इतरांनी विश्व नदी दिवसाचे महत्त्व पटवून देणारे विचार व्यक्त केले. याप्रसंगी बेळगाव, गोवा, धारवाड, हुबळी, कुडलसंगम आदी ठिकाणाहून अनेक निसर्गप्रेमी व पर्यावरणप्रेमीं सहभागी झाले होते. तसेच स्थानिक नागरिक व देवस्थानचे उपाध्यक्ष राजाराम गावडे, ग्रा. पं. माजी अध्यक्ष रमेश खोरवी व अऊण नाईक, उपाध्यक्ष नीलिमा महाले, सदस्या शकुंतला गस्ती, देवस्थानचे सेव्रेटरी लक्ष्मण गावडे, शांताराम गवस व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन पर्यावरणप्रेमी नायला कोयला यांनी केले.