14 मार्चपर्यंत चालणार अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक
वृत्तसंस्था / पानिपत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक रविवारपासून हरियाणाच्या पानिपतमध्ये सुरू झाली आहे. या बैठकीत सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासमवेत भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा सामील झाले आहेत. संघाची ही महत्त्वपूर्ण बैठक 14 मार्चपर्यंत चालणार आहे. 2024 मध्ये होणाऱया लोकसभा निवडणुकीपूर्वी संघ नेतृत्वाची ही अखेरची मोठी बैठक ठरणार असल्यामुळे संघ आणि भाजपदरम्यान समन्वयाचे काम करणारे काही चेहरे बदलले जाऊ शकतात. याचबरोबर संघाच्या काही पदाधिकाऱयांच्या जबाबदाऱया बदलण्याचा निर्णयही यात होऊ शकतो.
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे 4 दिवसांपूर्वीच पानिपतमध्ये पोहोचले हेते. येथे बैठकीसाठी निर्माण करण्यात आलेल्या केंद्रात त्यांनी संघाच्या प्रमुख पदाधिकाऱयांसोबत विचारविनिमय केला आहे. अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या या वार्षिक बैठकीत देशभरातून संघाचे 1400 स्वयंसेवक सामील होणार आहेत. यात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांच्यासह सर्व सहसरकार्यवाह, संघाची अखिल भारतीय कार्यकारिणी, क्षेत्रीय आणि प्रांतीय कार्यकारिणी, सर्व विभाग प्रचारकांसह संघाच्या 34 वेगवेगळय़ा संघटनांचे निवडक निमंत्रित स्वयंसेवक सामील होतील.
या महत्त्वपूर्ण बैठकीत 14 माचपर्यंत सातत्याने चर्चेच्या फेऱया पार पडणार आहेत. यादरम्यान संघाच्या 2022-23 च्या कामकाजाच्या समीक्षेसह पुढील वर्षी म्हणजेच 2023-24 च्या कार्यकारी योजनेवरही चर्चा होणार असल्याचे संघाचे अखिल भारतीय सह-प्रचार प्रमुख नरेंद्र यांनी सांगितले आहे.
संघ लवकरच गाठणार शतक
2025 मध्ये संघाच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण होणार आहेत. प्रतिनिधी सभेच्या बैठकीत शताब्दी वर्षावरून विशेष चर्चा होणार आहे. 2025 पर्यंत नव्या लोकांना संघाशी जोडण्याचे लक्ष्य समोर ठेवत 2023-24 च्या कार्यकारी योजनेच्या निर्मितीवर चर्चा होणार असल्याची माहिती संघाच्या अखिल भारतीय प्रचार प्रमुखांनी दिली आहे.
महर्षी दयानंद यांची जयंती
2024 मध्ये महर्षी दयानंद यांची 200 वी जयंती आहे. यासंबंधी संघाच्या बैठकीत विशेष वक्तव्य जारी करण्यात येणार आहे. स्वयंसेवकांची भरती, प्रशिक्षणासह संघाचे शिक्षावर्ग, शताब्दी विस्तारासह देशाच्या विद्यमान स्थितीवर विचारविनिमय केला जाणार आहे. बैठकीदरम्यान महत्त्वपूर्ण विषयांवरील प्रस्ताव देखील संमत केले जाणार आहेत. शाखा या संघाचा कणा आहेत आणि शाखाच सामाजिक बदलाचे केंद्र असल्याचे अखिल भारतीय प्रचारप्रमुखांचे सांगण्यात आले.
हरियाणाची निवड महत्त्वपूर्ण
हरियाणात संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक 12 वर्षांनी होत आहे. हरियाणात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. 2014 मध्ये हरियाणात पूर्ण बहुमतातील सरकार स्थापन करणाऱयाला भाजपला 2019 च्या निवडणुकीत बहुमत मिळविता आले नव्हते. भाजपने जननायक जनता पक्षाच्या मदतीने सरकार स्थापन केले होते. 2019 पासूनच हरियाणात भाजपची लोकप्रियता घटत असल्याचे मानले जात आहे.









