केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे मागणी
बेळगाव : बेळगाव व मुंबई या शहरादरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना सायंकाळी 6 नंतर मुंबईला जाण्यासाठी बेळगावमधून एकही रेल्वे उपलब्ध नाही. त्यामुळे रात्री 9 नंतर मुंबईला जाणारी एक्स्प्रेस सुरू करावी, तसेच सध्या सुरू असलेल्या हुबळी-पुणे वंदे भारतचा विस्तार मुंबईपर्यंत करावा, अशी मागणी नैर्त्रुत्य रेल्वेच्या सल्लागार समितीचे सदस्य प्रसाद कुलकर्णी यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे. बेळगाव शहराचा विकास झपाट्याने होत असल्याने मिरज-मंगळूर, बेळगाव-गोरखपूर-गुवाहाटी यादरम्यान एक्स्प्रेस सुरू झाल्यास प्रवाशांची सोय होणार आहे. त्याचबरोबर आठवड्यातून एकदा बेळगाव-हुबळी-रामेश्वर, बेळगाव-मंगळूर, हुबळी-अहमदाबाद अशा महत्त्वाच्या मार्गांवर रेल्वे सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
देसूरमध्ये हवा कोचिंग डेपो
हुबळी येथे कोचिंग डेपो असला तरी त्याठिकाणी गाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्याऐवजी बेळगावपासून जवळ असलेल्या देसूर रेल्वेस्थानकात रेल्वेच्या स्वच्छतेसाठी तीन पिटलाईन, तसेच दोन स्टॅबिंग लाईन सुरू कराव्यात. रेल्वेस्थानकात दोन अतिरिक्त प्लॅटफॉर्म तयार केल्यास बेळगाव व हुबळी रेल्वेस्थानकांवरील ताण कमी होण्यास मदत होईल, अशी विनंती त्यांनी नैर्त्रुत्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.









