Kolhapur News : मौजे वडगाव (ता.हातकणंगले )येथील केएमटी बस सेवा सुरू करावी.या मागणीसाठी सरपंच काशिनाथ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी कोल्हापूर -सांगली महामार्ग रोखून धरला.यामध्ये महिला बचत गट, महाविद्यालयीन विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. काल सायंकाळी चारच्या सुमारास हे आंदोलन झाल्याने कोल्हापूर -सांगली मार्गावरील वाहतुकीची मोठी कोंडी झाली.मात्र अवघ्या काहीच मिनिटात पोलिसांनी आंदोलकांना बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.
मौजे वडगाव येथील केएमटी बस सेवा कोरोना महामारीतील लाॅकडाऊन नंतर बंद आहे. यामुळे महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थी – विद्यार्थिनींची प्रचंड गैरसोय होत आहे. बससाठी विद्यार्थ्यांना सुमारे दीड ते दोन किलोमीटर चालत कोल्हापूर सांगली महामार्गावरील मौजे वडगाव फाटा येथे यावे लागते. मौजे वडगाव फाटा ते मौजे वडगाव हा रस्ता निर्मनुष्य असल्याने विद्यार्थिनींना विशेष काळजी घ्यावी लागते. सोबतीला कोणी नसेल तर त्यांना महाविद्यालयात जाणे टाळावे लागते. अशा परिस्थितीत विद्यार्थिनींनी शिक्षण घ्यायचे की नाही. असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला.
हेही वाचा- पट्टणकोडोली यात्रेत पाळणा घसरला, पाच जण जखमी
ज्या कुटुंबांमध्ये प्रवासाची पर्यायी व्यवस्था उपलब्ध नाही अशा कुटुंबातील अबाल वृद्धांना उन्हात व पावसात पायपीट करावी लागते. या सर्व बाबींचा विचार करून कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने मौजे वडगावची बस सेवा तात्काळ सुरू करावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. याबाबत मौजे वडगाव ग्रामपंचायतीने कोल्हापूर महापालिकेच्या परिवहन विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र याबाबत महापालिका प्रशासनाने कोणतीही सकारात्मक भूमिका घेतली नसल्याने कोल्हापूर – सांगली महामार्ग रोखावा लागला असल्याचे महिलांनी पोलीस प्रशासनाला सांगितले.आंदोलनकर्त्यांनी महिलांनी व युवतींनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील यांना यावेळी आपल्या मागणीचे निवेदन दिले.यावेळी मौजे वडगावचे सरपंच काशिनाथ कांबळे महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष महेश कांबरे, पोलिस पाटील अमीर हजारी, संजय सावंत, महिला बचत गटाच्या माधुरी चौगुले, पुनम खाडे, दिक्षा कांबळे, श्रेया सकटे, अक्षता लोंढे, आदी उपस्थित होते.
प्रवाशांची आर्थीक लुबाडणूक!
केएमटी बससेवा बंद झाल्यामुळे प्रवाशांना वडापचा आधार घ्यावा लागत आहे. प्रवाशांच्या परिस्थितीचा गैरफायदा वडाप रिक्षा वाहतूक करणारे मोठ्या प्रमाणात घेत आहेत. रिक्षा मध्ये क्षमतेपेक्षा अधिक जनावरांसारखे लोक बसवून प्रवासी वाहतूक सुरू आहे. तसेच दुप्पट दर आकारुन आर्थीक लुबाडणूकही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तरी संबंधित विभागाने वडाप वाहतूक करणाऱ्या लोकांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
Previous Articleरविवारी कोरोनाचे तीन नवे रुग्ण
Next Article अन्याय होत असेल तर खडसेंनी कोर्टात जावं









