अद्याप काही शिक्षकांची कागदपत्रे पडताळणी अपूर्ण
बेळगाव : बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यामध्ये कौन्सिलिंग झालेल्या शिक्षकांना नियुक्तीपत्रे देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत 150 शिक्षकांना शाळांवर रुजू होण्यासाठी नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. काहींनी अद्याप कागदपत्रे सादर न केल्याने टप्प्याटप्प्याने नियुक्तीपत्रे शिक्षण विभागाच्यावतीने दिली जात आहेत. यामुळे मागील अनेक वर्षांपासून शिक्षक होण्याचे स्वप्न पाहिलेल्या उमेदवारांना अखेर नियुक्तीपत्रे देण्यात आल्याने त्यांचा आनंद गगनात मावणारा नव्हता. मागीलवर्षी राज्यात 15 हजार शिक्षकांची भरती करण्यात आली. जातनिहाय उमेदवार कमी झाल्याने 13500 शिक्षकांची नेमणूक करण्यात आली. परंतु, भरती प्रक्रिया न्यायालयीन कचाट्यात अडकल्याने वर्षभरापासून प्रक्रिया थांबली होती. उच्च न्यायालयाने हिरवाकंदील देताच भरती प्रक्रियेला मागील महिन्यापासून सुरुवात झाली. बी. के. मॉडेल शाळेत उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीनंतर दहावी, बारावी तसेच पदवी प्रमाणपत्रांची त्या-त्या विद्यापीठ व संस्थांकडे चौकशी करण्यात आली. याबरोबरच जात, वंशावळ, उत्पन्न माहितीसाठी सिंधुत्व प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आले आहे. सिंधुत्व प्रमाणपत्र व इतर कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांना सार्वजनिक शिक्षण विभागाने नियुक्तीपत्रे देण्यास सुरुवात केली आहे. मागील चार दिवसांमध्ये 150 शिक्षकांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत.
सिंधुत्व प्रमाणपत्रासाठी धावाधाव
जात, वंशावळ व उत्पन्न यांचा तपशील सिंधुत्व प्रमाणपत्रावर अवलंबून असतो. तलाठी, सर्कल, तहसीलदार यांच्या सहीनंतर ते प्रमाणपत्र त्रिसदस्यीय समितीकडे दिले जाते. समितीकडून कागदपत्रांची पाहणी करून सिंधुत्व प्रमाणपत्र देण्यात येते. बेळगावसह खानापूर तालुक्यात तलाठी, सर्कल व तहसीलदार वेळेच्यावेळी उपलब्ध होत नसल्याने उमेदवारांची धावपळ सुरू आहे. सिंधुत्व प्रमाणपत्रासाठी काही ठिकाणी पैसे मोजावे लागत असल्याने उमेदवारांतून नाराजीचा सूर उमटत आहे.









