उत्तर कन्नड स्वाभिमानी संघर्ष समितीची मागणी
बेळगाव : उत्तर कन्नड जिल्ह्यात सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजची कमतरता असल्याने नागरिकांना आरोग्याच्या सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. आरोग्यासाठी हुबळी आणि मंगळूर या शहरांवर अवलंबून रहावे लागत आहे. त्यामुळे तातडीने उत्तर कन्नड जिल्ह्यात सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज सुरू करावे, अशी मागणी उत्तर कन्नड स्वाभिमानी संघर्ष समिती आणि मेडिकल कॉलेज सुपरस्पेशालिटी संघातर्फे करण्यात आली आहे. उत्तर कन्नड जिल्ह्यात लोकसंख्या अधिक आहे. मात्र, जिल्ह्यात सरकारी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज नाही. त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मिळेनाशा झाल्या आहेत. शिवाय विद्यार्थ्यांना देखील मेडिकलच्या शिक्षणापासून दूर रहावे लागत आहे. आरोग्याच्या सुविधांसाठी आणि विद्यार्थ्यांना मेडिकलचे शिक्षण घेण्यासाठी हुबळी आणि मंगळूरची वारी करावी लागत आहे. दरम्यान, उत्तर कन्नड जिल्ह्यापासून हुबळी आणि मंगळूर शहरे दूर असल्याने रुग्णांना घेऊन जाताना वाटेतच मृत्यू होऊ लागला आहे. त्यामुळे जिल्ह्यात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल शासनाने स्थापन करून जनतेला दिलासा द्यावा अशी मागणीही आंदोलकांनी केली आहे.









