अहिंद वकील संघटनेतर्फे पालकमंत्र्यांना मागणीचे निवेदन
बेळगाव : बेळगाव येथे राज्य ग्राहक आयुक्त न्यायालयाच्या पीठासाठी मंजुरी मिळाली आहे. मात्र या पीठाचा कार्यभार अद्याप सुरू करण्यात आलेला नाही. यामुळे ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासाठी या पीठाचा कार्यभार त्वरित सुरू करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन अहिंद वकील संघटनेतर्फे अॅड. एन. आर. लातूर यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना देण्यात आले. यावेळी आमदार राजू सेठ, जिल्हाधिकारी नितेश पाटील, जि. पं. कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे उपस्थित होते. राज्य ग्राहक आयुक्त न्यायालयाच्या कायमपीठासाठी गेल्या चार वर्षांपासून आंदोलन करण्यात येत आहे. त्यानुसार न्यायालय सुरू करण्यासाठी शिफारस केली आहे. त्यासाठी इमारतीही मंजूर केली आहे. मात्र पीठाचा कार्यभार प्रारंभ करण्यात आलेला नाही. यामुळे ग्राहक न्यायालयाच्या प्रकरणासंदर्भात असणाऱ्या तक्रारी निवारण करण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
केपीआयडी न्यायालय बेळगावमध्ये स्थापन करा
याबरोबरच शहरासह परिसरातील जिल्ह्यातील सहकारी संस्थांमध्ये ठेवी ठेवल्या आहेत. मात्र सहकार सोसायट्यांकडून ठेवीदारांची फसवणूक करण्यात आली आहे. 25 हजारांपेक्षा अधिक ठेवीदारांना फटका बसला आहे. त्यामुळे या संदर्भातील पुरावे केपीआयडी कोर्टच्या आदेशानुसार पुरविले जात आहेत. यासाठी नागरिकांना बेंगळूरला जावे लागत आहे. यामध्ये नागरिकांची ससेहोलपट होत आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी केपीआयडी न्यायालय बेळगावमध्ये स्थापन करण्यात यावे, अशी मागणीही वकील संघटनेकडून देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी अॅड. डी. एस. बिर्जे, अॅड. वाय. एन. लमाणी आदी उपस्थित होते.









