एबीव्हीपी कार्यकर्त्यांचे तहसीलदारांना निवेदन
खानापूर : येथील मलप्रभा क्रीडांगणाच्या मागील बाजूस नव्याने बांधण्यात आलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे वसतिगृह उद्घाटनाविना बंद अवस्थेत आहे. हे वसतिगृह येत्या 10 तारखेपर्यंत सुरू करण्यात यावे, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा एबीव्हीपी संघटनेने तहसीलदारांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.
कर्नाटक शासनातर्फे येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी 2019 साली केआयआरडीएल या प्राधिकरणाच्या माध्यमातून वसतिगृह बांधले. मात्र गेल्या तीन वर्षापासून हे वसतिगृह बंद असल्याने वसतिगृहाची दुरवस्था झाली आहे. वसतिगृहाचे वेगवेगळय़ा कंत्राटदारांनी बांधकाम केले आहे. काही तांत्रिक बाबींमुळे या वसतिगृहाचे हस्तांतरच झाले नव्हते. गेल्या महिन्याभरापूर्वी हे वसतिगृह केआयआरडीएलकडून महाविद्यालयीन प्राचार्यांकडे हस्तांतर करण्यासाठी प्रयत्न झाला. मात्र प्राचार्यांनी संपूर्ण दुरुस्ती करून दिल्यावरच हस्तांतर करून घेवू, असे स्पष्ट केल्याने फक्त काचा आणि दरवाजे दुरुस्ती करून हे हस्तांतर केल्याची माहिती सरकारी महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप जवळकर यांनी दिली.
वसतिगृहाच्या बाजूने संरक्षक भिंत तसेच समोरील फाटक व अन्य काही सुविधांचा अभाव असल्याने वसतिगृहाचे उद्घाटन करणार नसल्याचे प्राचार्य दिलीप जवळकर यांनी स्पष्ट केले आहे. वसतिगृह सरकारी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी असल्याने याबाबत तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये काही गैरसमज पसरलेला आहे. ते दूर होणे गरजेचे आहे. वसतिगृहात फक्त सरकारी महाविद्यालयाचे विद्यार्थी राहू शकतात. त्यामुळे अन्य महाविद्यालयात शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांना येथे प्रवेशाची तरतूद नाही. यासाठी समाज कल्याण खात्याकडे हस्तांतर केल्यानंतर काही तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर हे वसतिगृह सुरू होईल, असे दिलीप जवळकर यांनी स्पष्ट केले.









