उचगाव ग्रा. पं. ला ग्रामस्थांचे मागणीचे निवेदन
वार्ताहर/उचगाव
उचगाव येथील प्राथमिक मराठी शाळेमध्ये इयत्ता आठवीचा वर्ग चालू ठेवावा. तसेच नववी, दहावी करून सरकारी माध्यमिक शाळा याच ठिकाणी सुरू करावी. अशा मागणीचे निवेदन उचगाव ग्रामपंचायतीला सोमवारी ग्रामस्थांनी मोर्चाद्वारे दिले. येथील ग्रामसभेमध्ये आठवीचा वर्ग बंद करण्यात यावा अशा प्रकारची चर्चा, ठराव करण्यात आला होता. मात्र ग्रामस्थांच्या मतानुसार प्राथमिक शाळेमध्येच आठवी ते दहावी असे सरकारी माध्यमिक वर्ग भरविण्यात यावेत आणि मराठी शाळाच मोठी करून तीच टिकवावी अशा प्रकारचा एकमुखी निर्णय उचगाव ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला. मराठी शाळेची सुधारणा करण्यासाठी ग्रामस्थांनी सर्वतोपरी सहकार्य करून ही शाळा वाढवावी असेही सर्वांच्यामध्ये ठरविण्यात आले.









