अन्यथा रास्तारोकोसह उग्र आंदोलनाचा इशारा : जांबोटीत झालेल्या बैठकीत निर्धार
वार्ताहर /जांबोटी
दीड वर्षांपूर्वी बेळगाव-चोर्ला राज्य महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन या रस्त्याच्या विकासासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक विकास मंत्री नितीन गडकरी यांनी 263 कोटीचा निधी मंजूर करून रस्त्याच्या कामाचे औपचारिक उद्घाटन केले होते. मात्र पर्यावरणप्रेमींनी या रस्त्याच्या विकासासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे बेळगाव-चोर्ला रस्त्याचा विकास रखडल्यामुळे बेळगाव-गोवा आंतरराज्य वाहतूक कोलमडली आहे. खराब रस्त्यामुळे जांबोटी-कणकुंबी भागातील नागरिकांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत.
अनेकवेळा अर्जविनंत्या करूनदेखील सुस्तावलेल्या प्रशासनाने या रस्त्याच्या दुऊस्तीकडे दुर्लक्ष केले आहे. आगामी आठ दिवसात रस्ता दुऊस्तीचे काम हाती न घेतल्यास गणेशचतुर्थीपूर्वी जांबोटी-कणकुंबीत रास्तारोको करून प्रशासनाच्या विरोधात उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राज्य अध्यक्ष व पश्चिम भाग विकास आघाडीचे अध्यक्ष किरण गावडे यांनी बुधवारी चोर्ला रस्त्याच्या समस्यासंदर्भात जांबोटी येथे आयोजित केलेल्या नागरिकांच्या बैठकीत बोलताना दिला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जांबोटी विभागाचे जिल्हा पंचायत माजी सदस्य जयराम देसाई होते.
रवींद्र शिंदे यांनी प्रास्ताविक करून बैठकीचा उद्देश सांगितला. पुढे बोलताना किरण गावडे म्हणाले, पर्यावरणाचे संरक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. रस्त्याच्या विकासामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होण्याचे सबब पुढे करून प्रशासनाने विकास कामात अडथळा आणू नये. रस्त्याचा प्रश्न या भागातील जनतेच्या जीवनमरणाचा प्र्रश्न असल्यामुळे प्रशासनाला जाग आणण्यासाठी या भागातील सर्व ग्रामपंचायतींनी रस्त्याच्या विकासाचा ठराव करून शासनाकडे पाठवावेत. तसेच मार्च 2023 मध्ये रस्त्याच्या फक्त दुऊस्तीसाठी मंजूर झालेल्या 2 कोटी 65 लाख निधीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.
पक्षभेद विसरून सर्वांनी रस्त्याच्या विकासासाठी पुढे यावे
यावेळी बोलताना आमटे ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष लक्ष्मण कसर्लेकर म्हणाले. या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पक्षभेद व राजकीय मतभेद बाजूला ठेवून प्रत्येकाने यासाठी पुढाकार घेतल्यास या रस्त्याच्या विकासाचा प्रश्न नक्कीच मार्गी लागेल, असे प्रतिपादन केले. बैठकीला आमटे ग्रा. पं. माजी अध्यक्ष विठ्ठल गुरव, सखाराम धुरी, रवींद्र शिंदे, पुंडलिक पाटील, शिवाजी गावकर, बसवंत नाईक, माऊती चिगुळकर, रामा गावकर, श्रीकांत गावकर, शंकर सडेकर, रायाप्पा गावडे, दर्शन नाईक, परशराम गावडे, निंगाप्पा बळजी, रघुनाथ बामणे, प्रभाकर बिर्जे, बळवंत शेगाळे, विठ्ठल नाईक यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. संतोष कदम यांनी उपस्थितांचे आभार मानले.
जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये
बैठकीत अध्यक्षस्थानावरून बोलताना जिल्हा पंचायत माजी सदस्य जयराम देसाई म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून जांबोटी-कणकुंबी भागातील जनतेवर कोणत्या ना कोणत्या कारणाने अन्याय होत आला आहे. पर्यावरण व वनखाते विकासकामात नेहमीच अडथळा आणत असल्यामुळे या दुर्गम भागाचा विकास खुंटला आहे. यापुढे प्रशासनाने जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, लवकरात लवकर चोर्ला रस्त्याची समस्या मार्गी लावावी. अन्यथा जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड इशारा शासनाला दिला.









