पोलीस-नगरसेवकाच्या सूचनेनंतर कार्यवाही
बेळगाव : शहरात 24 तास पाणी योजनेसाठी एलअँडटीकडून गल्लीबोळात खोदकामात करण्यात आले आहे. मात्र, चरी बुजविण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने नगरसेवक शंकर पाटील यांनी एलअँडटी कार्यालयासमोर धरणे धरले होते. याची दखल घेत चरींवर खडी व बोल्डर घालून बुजविण्यात आल्या आहेत. पण त्यावर बारीक चिपिंग घालण्याची सूचना केयुआयडीएफसी अधिकाऱ्यांना करण्यात आल्याने बुधवारपासून पुन्हा त्या चरीवर बारीक चिपिंग घालण्याचे काम सुरू झाले आहे. यापूर्वी शहराच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी पाणीपुरवठा महामंडळाकडे होती.
काही वर्षांपूर्वी मनपाने एलअँडटीला पाणीपुरवठ्याची जबाबदारी सोपविली आहे. त्यानुसार शहरातील सर्व 58 प्रभागांमध्ये 24 पाणी योजनेसाठी खोदकाम सुरू आहे. ज्या ठिकाणी जलवाहिनी घालण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्या ठिकाणी चरीमध्ये केवळ माती ओढून बुजविल्या होत्या. पण यामुळे रहिवासी व वाहनधारकांना धोका पत्करत ये-जा करत होते.गणेशोत्सवाच्या काळात गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी चरीमध्ये काँक्रिट किंवा डांबरीकरण घालण्यात यावे, अशी मागणी नागरिकातून करण्यात येत होती. पण त्याकडे एलअँडटीने दुर्लक्ष केल्याने काही दिवसांपूर्वी नगरसेवक शंकर पाटील यांनी एलअँडटी कार्यालयासमोर धरणे धरले होते. त्यामुळे 15 ऑगस्टपूर्वी चरी बुजविल्या जातील, असे आश्वासन दिले होते.
सूचनांचे पालन केल्याने समाधान
चरी बुजविण्यात आल्या आहेत. पण त्यामध्ये खडी व बोल्डर घालण्यात आल्याने त्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीपूर्वी चरीवर पुन्हा बारीक चिपिंग घालण्यात यावे, अशी सूचना केयुआयडीएफसी अधिकाऱ्यांना खडेबाजारचे पोलीस निरीक्षक श्रीशैल गाभी व नगरसेवक शंकर पाटील यांनी केल्याने बुधवारपासून चरीवर पुन्हा चिपिंग टाकण्याचे काम सुरू झाले आहे.









