निलजी ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : बेळगाव-पंढरपूर रेल्वेसेवा बंद करण्यात आल्यामुळे या भागातील वारकरी संप्रदायाच्या भाविकांची मोठी गैरसोय होत आहे. पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी जाण्यास असणारी रेल्वेची सोय बंद झाल्याने भाविकांचा हिरमोड होत आहे. यासाठी पूर्वीप्रमाणे बेळगाव-पंढरपूर रेल्वेसेवा सुरू करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन निलजी येथील श्री राम मंदिर ट्रस्ट यांच्यातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. जिल्ह्यासह परिसरात पंढरपूरच्या विठ्ठलाचे भक्त मोठ्या संख्येने असून प्रत्येक वर्षी आषाढी व एकादशीला हे भाविक वारीला जातात. मात्र गेल्या काही वर्षांपासून बेळगाव-पंढरपूर रेल्वेसेवा रद्द करण्यात आली आहे. यामुळे वारीला जाणाऱ्या भक्तांची मोठी गैरसोय होत आहे. बेळगाव जिल्ह्यासह शेजारील महाराष्ट्र, गोवा येथील भाविकांना ही रेल्वेसेवा अत्यंत उपयोगी ठरली होती. मात्र कोरोना काळानंतर रेल्वेसेवा बंद करण्यात आल्यामुळे विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही गैरसोय दूर करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
रेल्वेसेवा सुरू केल्यानंतर भाविकांना विठोबाच्या दर्शनासाठी जाण्यासाठी सोय होईल. तसेच सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळू शकतो. आषाढी-कार्तिकी वारीबरोबरच इतर वेळीही पंढरपूरला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. ही सेवा सुरू केल्यास भाविकांची सोय होणार आहे तर सरकारच्या आर्थिक विकासालाही चालना मिळणार आहे. याची दखल घेऊन सरकारने बेळगाव-पंढरपूर रेल्वेसेवा सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी अॅड. लक्ष्मण पाटील, अॅड. अमृत कोल्हटकर, गंगाराम मोदगेकर, आप्पाजी अगशीमनी, मधू मोदगेकर, नागेश दिवटे, भरमा गोमाणाचे, बाळाराम मोदगेकर, विष्णू पाटील, शामराव पाटील आदी उपस्थित होते.









