खासदार शेट्टर यांची केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींकडे मागणी
बेळगाव : बेळगावच्या नागरिकांकडून मागणी होत असलेली बेळगाव-बेंगळूर वंदे भारत एक्स्प्रेस लवकर सुरू करावी. सकाळी बेळगावहून निघालेली एक्स्प्रेस दुपारी बेंगळूरला पोहोचेल व त्यानंतर रात्री पुन्हा बेळगावला येईल, अशा पद्धतीने या वंदे भारतचे नियोजन करावे, अशी मागणी खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे केली. हुबळी येथील प्रल्हाद जोशी यांच्या कार्यालयात रेल्वे अधिकारी, तसेच लोकप्रतिनिधींची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत खासदार शेट्टर यांनी बेळगावच्या रेल्वे प्रश्नांना वाचा फोडली. या बैठकीला नैर्त्रुत्य रेल्वेचे सरव्यवस्थापक अरविंद श्रीवास्तव, तसेच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
लोकापूर-सौंदत्ती या रेल्वेमार्गाची मागणी होत आहे. 2019 मध्ये या रेल्वेमार्गासाठी सर्वेक्षण करण्यात आले होते. परंतु, अद्याप या रेल्वेमार्गाबाबत सरकार कोणतीही हालचाल करताना दिसत नाही. यल्लम्मा देवस्थानला हजारो भाविक भेट देत असतात. त्यामुळे या रेल्वेमार्गामुळे भाविकांची सोय होणार असल्याचे खासदार शेट्टर यांनी सांगितले. त्याचबरोबर हुबळी-बेळगाव-मिरज रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून मेमू ट्रेन्स सुरू केल्यास त्याचा फायदा प्रवाशांना होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीला हुबळी विभागाच्या व्यवस्थापक बेला मीणा यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.









