खासदार शेट्टर यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
बेळगाव : बेळगावमध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी आंत्रप्रेन्योरशिप अँड मॅनेजमेंट (एनआयएफटीईएम) ची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी बेळगावच्या खासदारांनी केंद्रीय मंत्र्यांकडे केली आहे. खासदार जगदीश शेट्टर यांनी नुकतीच दिल्ली येथे केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ही मागणी केली आहे. राज्यात कृषी क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे. येथे बाजरी, गहू, कडधान्ये, ऊस, तंबाखू यासह इतर पिके घेतली जातात. त्याचबरोबर मिरी, वेलची, लसूण, तमालपत्र आदी मसाले इतर देशांमध्ये निर्यात केले जातात. बेळगाव शहर विकासाच्या बाबतीत बरेच पुढे आहे. हैड्रोलिक्स उद्योगाची स्थापना सर्वप्रथम बेळगावमध्ये झाली. त्यामुळे बेळगावमध्ये एनआयएफटीईएम केंद्र सुरू केल्यास शेतकरी, उद्योजकांनाही उपयोग होईल, असे त्यांनी सांगितले.









