चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांची लघुउद्योगमंत्र्यांकडे मागणी
बेळगाव : बेळगाव हे शहर महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकच्या सीमेवर असल्याने उद्योगाला मोठी संधी आहे. परंतु, उद्योगवाढीसाठी पायाभूत सुविधा नसल्याने उद्योजकांचे मोठे नुकसान होत आहे. महाराष्ट्राच्या धर्तीवर बेळगावमध्ये 2000 एकर जागेत पंचतारांकित औद्योगिक वसाहत सुरू करून त्यामध्ये स्थानिक उद्योगांसह बाहेर देशातील उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजच्यावतीने राज्याचे लघुउद्योगमंत्री शरणबसाप्पा दर्शनपूर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच लघुउद्योगमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर बेळगावमधील समस्या मांडल्या.
बेळगावमध्ये फौंड्री उद्योग मोठ्या प्रमाणात असून त्यांना जागेची कमतरता भासत आहे. बेळगावमध्ये ड्रोन मॅन्युफॅक्चरिंग हब विकसित करावे. सूक्ष्म, लघु व स्टार्टअपसाठी कमी किमतीत कच्चामाल उपलब्ध करून द्यावा. त्याचबरोबर वाहतुकीसाठी रिंगरोडचे काम लवकर पूर्ण करावे. बेळगाव-गोवा महामार्गाचे रुंदीकरण करून काँक्रिटीकरण करावे. कोल्हापूर-बेळगाव-हुबळी दरम्यान नवा रेल्वेमार्ग तयार करावा. बेळगावमधील विमानफेऱ्या वाढवाव्यात, यासह इतर मागण्या लघुउद्योग मंत्र्यांकडे करण्यात आल्या. मंत्र्यांनी चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजीव कट्टीशेट्टी, प्रभाकर नागरमुन्नोळी, स्वप्निल शहा, उदय जोशी, मनोज मत्तीकोप्प, रोहन जुवळी, आनंद देसाई यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.









