गोवा खंडपीठाचा आदेश : ऍड शशिकांना जेशी यांनी मांडली प्रभावी बाजू
प्रतिनिधी /वाळपई
वाळपई या ठिकाणी कार्यरत असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयामध्ये 11 वी विज्ञान शाखा सुरू करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेले आहेत. ऍड शशिकांत जोशी यांनी याचिकादारांच्या वतीने न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडताना महत्त्वाचे योगदान दिले आहे.
याची दखल घेत जवाहर नवोदय विद्यालयाच्या समितीतर्फे विज्ञान शाखा व इतर कामांसाठी 35 लाख रुपये निधी मंजूर केलेला आहे. यासाठी ठेकेदाराची नियुक्ती केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. वाळपई नवोदय विद्यालयाचा जमिनीचा प्रश्न गेल्या वीस वर्षांपासून प्रलंबित आहे. त्याचप्रमाणे या विद्यालयात अनेक स्तरावर निर्माण होणाऱया समस्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात न्यायप्रविष्ठ आहे. हा प्रश्न सुटण्यसाठी सत्तरीचे सुपुत्र ऍड. शशिकांत जोशी यांनी याचिकादारांच्या वतीने बाजू मांडताना आतापर्यंत चांगले योगदान दिले आहे. 11 वी विज्ञान शाखा सुरू करण्याबाबत त्यांनी पालकांची भूमिका योग्य प्रकारे मांडली. त्यामुळे पालकांच्या मागणीला यश आले. याबाबत पालकांनी ऍड. जोशी यांचे अभिनंदन केले आहे.
वाळपई जवाहर नवोदय विद्यालयात 11 वी. विज्ञान शाखा सुरू करण्यासाठी पालकांकडून सातत्याने मागणी सुरू होती. दरम्यान, पालक सुबोध देसाई व राजेंद्र गावस यांनी यासंदर्भाची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल केली होती.
जमिनीचा प्रश्न अद्याप प्रलंबित : ऍड शशिकांत जोशी
दरम्यान, वाळपई जवाहर नवोदय विद्यालय हे चांगले शैक्षणिक संकुल आहे. याठिकाणी मुलांसाठी चांगल्या साधनसुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. मात्र जमिनीचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक विकासावर परिणाम होत आहे. 11 वी विज्ञान शाखेसंदर्भात याचिकेवर खंडपीठाने प्राधान्याने लक्ष देऊन 11 वी. विज्ञान शाखा सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत, असे ऍड. शशिकांत जोशी यांनी स्पष्ट केले.
वाळपई विद्यालयांमध्ये 11 वी विज्ञान शाखा सुरू होणे, हे काळाची गरज होती. यासाठी न्यायालयाच्या दरवाजा ठोठावावा लागला ही खरोखरच खेदाची बाब आहे. तरीसुद्धा पालकांनी यासाठी दिलेले सहकार्य महत्त्वाचे आहे. यापुढे या विद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांचे सहकार्य अपेक्षित आहे, असे याचिकदार सुबोध देसाई व राजेंद्र गावस यांनी सांगितले.









