विल जॅक्स मुंबईच्या शेवटच्या दोन साखळी सामन्यांत सहभागी होणार, स्टोइनिसही परतणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली कॅपिटल्सचे मिचेल स्टार्क आणि डोनोव्हन फेरेरा यांनी आयपीएलच्या उर्वरित सामन्यांसाठी परत न येण्याचा निर्णय घेतला आहे, तर इंग्लंडचा अष्टपैलू विल जॅक्स मुंबई इंडियन्सला त्यांच्या शेवटच्या दोन लीग सामन्यांसाठी येऊन मिळेल.
ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज स्टार्क आणि दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज फेरेरा यांनी दिल्ली कॅपिटल्स व्यवस्थापनाला त्यांचा निर्णय कळवला आहे. स्टार्क दिल्लीच्या मोहिमेतील एक महत्त्वाचा खेळाडू राहिलेला असून 11 सामन्यांमध्ये 26.14 च्या सरासरीने 14 बळी घेऊन त्यांचा आघाडीचा बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याची अनुपस्थिती दिल्लीच्या आधीच कमी झालेल्या प्लेऑफसाठी पात्र ठरण्याच्या आशांना मोठा धक्का आहे.
दरम्यान, फेरेरा या हंगामात फक्त एकदाच खेळला आहे. उर्वरित तीन लीग सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिकेचा त्याचा सहकारी ट्रिस्टन स्टब्स दिल्ली संघात सामील झाला आहे. दिल्ली पात्र ठरल्यास वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळण्यासाठी जाणार असलेला स्टब्स प्लेऑफसाठी अनुपलब्ध असेल. तथापि, दिल्लीचा उपकर्णधार फाफ डू प्लेसिसच्या उपलब्धतेबाबत अद्याप स्पष्टता नाही. पंजाब किंग्ससाठी मार्कस स्टोनिस आणि जोश इंग्लिस यांनी संघात सामील होण्यास सहमती दर्शविली आहे. परंतु आयपीएल पुन्हा सुरू झाल्यानंतर 18 मे रोजीचा पहिला सामना त्यांना चुकेल. मुंबईचा फलंदाज जॅक्सने शुक्रवारी इन्स्टाग्रामवर मुंबईला जाणाऱ्या त्याच्या विमानाच्या तिकिटाचे छायाचित्र टाकून त्याच्या पुनरागमनाची पुष्टी केली आहे.
परंतु जोस बटलरप्रमाणे जॅक्स मुंबई इंडियन्सचे साखळी फेरीतील शेवटचे दोन सामने खेळल्यानंतर राष्ट्रीय संघात समाविष्ट होण्यासाठी रवाना होईल. कारण आयपीएलचा प्ले-ऑफ टप्पा ज्यावेळी खेळविला जाईल त्याचवेळी म्हणजे 29 मेपासून इंग्लंडची वेस्ट इंडिजविऊद्धची मर्यादित षटकांची मालिका होणार आहे. मुंबई इंडियन्स सध्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे आणि प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी त्यांना त्यांचे उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील. भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी तणावामुळे आयपीएल एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली होती. ती आज शनिवारी पुन्हा सुरू होत असून अंतिम सामना 25 मेवरून 3 जून असा पुढे ढकलण्यात आला आहे. मात्र याचवेळी दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजचे आंतरराष्ट्रीय सामने होणार असल्याने त्यांचे खेळाडू आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाहीत.









