बेळगाव-जयपूर, बेळगाव-बेंगळूर मार्गावर विमान सेवा होणार सुरू : प्रवाशांना सोयीचे ठरणार
बेळगाव : स्टार एअर या विमान कंपनीची सोमवार दि. 15 पासून बेळगाव-जयपूर व बेळगाव-बेंगळूर ही सेवा सुरू होत आहे. बऱ्याच दिवसांनंतर बेळगाव विमानतळावरून नवीन शहराला विमानफेरी सुरू होत असल्याने प्रवाशांमध्ये उत्सुकता आहे. केवळ जयपूरच नाही तर बेंगळूर शहरालाही अतिरिक्त विमानफेरी उपलब्ध होणार असल्याने प्रवाशांना सोयीचे ठरणार आहे. बेळगाव विमानतळ हे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक व कोकण यांच्यामध्ये असल्यामुळे प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळतो. यामुळेच देशातील महत्त्वाच्या शहरांना या दोन विमानसेवा दिल्या जात आहेत. मध्यंतरीच्या काळात ‘उडान’ योजनेचा कार्यकाळ संपल्याने बऱ्याच विमानसेवा बंद झाल्या. तसेच स्टार एअर, एलायन्स एअर व ट्रू जेट या कंपन्यांनी बेळगावमधील सेवा बंद केल्याने मुंबई, दिल्ली, चेन्नई, कडप्पा, पुणे यासारख्या शहरांच्या सेवा बंद झाल्या. यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी होती. स्टार एअरने बेळगाव-जयपूर व बेळगाव-बेंगळूर या मार्गावर आठवड्यातून तीन दिवस विमानफेरी सुरू करण्याचा निर्णय घेतला. सोमवार, बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस या दोन्ही शहरांना विमानसेवा दिली जाणार आहे. दुपारी 12.55 वाजता बेळगावमधून निघालेले विमान 3.10 वाजता जयपूरला पोहोचणार आहे. तर दुपारी 3.40 वाजता जयपूर येथून निघालेले विमान सायंकाळी 5.55 वाजता बेळगावला पोहोचेल. बेंगळूर-बेळगाव-बेंगळूर या मार्गावर सकाळी 11.25 वाजता बेंगळूर येथून निघालेले विमान 12.30 वाजता बेळगावला पोहोचेल. तर सायंकाळी 6.20 वाजता बेळगावमधून निघालेले विमान रात्री 7.30 वाजता बेंगळूरला पोहोचेल. कंपनीने सोमवार दि. 15 मे पासून या दोन्ही शहरांना विमानफेरी सुरू करण्याची घोषणा केली. तसेच बुकिंगही सुरू केले. बेळगाव-जयपूर मार्गावर प्रथमच विमानफेरी सुरू होत असल्याने प्रवाशांमध्ये उत्सुकता आहे. राजस्थान परिसरातील अनेक व्यापारी, उद्योजक यांची नेहमी बेळगावला ये-जा असते. त्यामुळे ही फेरी महत्त्वाची ठरणार आहे. सध्या इंडिगो एअरलाईन्स बेळगाव-बेंगळूर मार्गावर सकाळ व संध्याकाळ अशा दोन फेऱ्या सेवा देत आहे. त्यामध्ये आता स्टार एअरची भर पडणार असल्याने नागरिकांना राज्याच्या राजधानीला पोहोचणे सुखकर होईल.









