महिलेचा मृत्यू : अल्लू अर्जुनला भेटायला आलेल्या चाहत्यांवर लाठीमार
वृत्तसंस्था/हैदराबाद
हैदराबादमध्ये अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान चेंगराचेंगरी झाली. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झाले आहेत. अल्लू अर्जुन बुधवारी रात्री संध्या थिएटरमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आला होता. याप्रसंगी आरटीसी एक्स रोड येथील थिएटरबाहेर जमलेल्या चाहत्यांना अल्लू अर्जुनला भेटायचे होते. यादरम्यान अचानक चेंगराचेंगरी झाली. याप्रसंगी अनेक जण एकमेकांवर पडल्याने काही लोक जखमीही झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. जमाव पांगल्यानंतर पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी एका महिलेला मृत घोषित केले. तसेच अन्य 3 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचे अनेक व्हिडिओही समोर आले आहेत. यामध्ये अल्लू अर्जुनचे चाहते बेशुद्धावस्थेत पडल्याचे दिसून येत आहेत.









