आरपीएफ निरीक्षकाच्या चौकशी अहवालाचा निष्कर्ष : दुर्घटनेत 18 जणांनी गमाविला होता जीव
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नवी दिल्ली रेल्वेस्थानकावर शनिवारी चेंगराचेंगरी होत 18 जणांना जीव गमवावा लागला होता. रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) एका निरीक्षकाच्या अहवालानुसार प्रयागराज येथे जाणाऱ्या कुंभ विशेष रेल्वेचा प्लॅटफॉर्म बदलण्याच्या उद्घोषणेमुळे ही दुर्घटना घडली आहे. हा अहवाल आरपीएफ स्वत:च्या अंतिम अहवालात समाविष्ट करणार आहे. हा अंतिम अहवाल रेल्वे मंत्रालयाकडून स्थापन दोन सदस्यीय उच्चस्तरीय समितीला सोपविण्यात येणार आहे.
आरपीएफ निरीक्षकाने स्वत:चा अहवाल दिल्ली झोनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोपविला आहे. शनिवारी रात्री जवळपास 8.45 वाजता प्रयागराज येथे जाणारी कुंभ स्पेशल रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वरून सुटणार अशी उद्घोषणा करण्यात आली होती. यानंतर काही वेळातच कुंभ स्पेशल रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक 16 वरून सुटणार अशी उद्घोषणा करण्यात आली. यामुळे प्रवाशांमध्ये तेथे जाण्यासाठी चढाओढ निर्माण होत चेंगराचेंगरी झाल्याचे अहवालात नमूद आहे.
चेंगराचेंगरी कशी घडली?
दुर्घटनवेळी प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वर मगध एक्स्प्रेस उभी होती, तर प्लॅटफॉर्म क्रमांक 15 वर उत्तर संपर्क क्रांति एक्स्पे्रस उभी होती. प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वर प्रयागराज एक्स्प्रेसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांनी गर्दी केली होती. अशातच दुसरी उद्घोषणा कानी पडताच प्रवासी प्लॅटफॉर्म क्रमांक12-13 आणि 14-15 रवून फूट ओव्हर ब्रिज क्रमांक 2 आणि 3 द्वारे चढू लागले, तर दुसरीकडे मगध, उत्तर संपर्क क्रांति एक्स्प्रेसचे प्रवासी खाली उतरत होते. धक्काबुक्तीत काही प्रवासी घसरून खाली पडले आणि जखमी झाले आणि इतर प्रवासी त्यांच्यावरून चालत राहिल्याचे अहवालात म्हटले गेले आहे.
अनेक विभागांकडून मागविला अहवाल
या दुर्घटनेप्रकरणी अनेक विभागांकडून अहवाल मागविण्यात आला असून यात आरपीएफ देखील सामील आहे. सर्वांकडून अहवाल मिळाल्यावर रेल्वे मंत्रालयाकडून स्थापन उच्चस्तरीय समिती त्यांच्याकडून काही प्रश्नांची उत्तरे मिळविणार आहे अणि मग अंतिम निष्कर्षावर पोहोचणार असल्याचे उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी हिमांशु शेखर उपाध्याय यांनी सांगितले आहे.









