मंगळवारपासून सुरू होणार सुनावण्या 2020 पासूनची 322 प्रकरणे प्रलंबित
पणजी : सहा महिन्यांनंतर राज्य महिला आयोगावर इतर सदस्यांची नेमणूक झाल्यानंतर आता येत्या मंगळवारपासून सुनावण्या सुरू करण्याचा निर्णय आयोगाने घेतलेला आहे. तसेच महिला आयोगाने कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक छळाबाबत राज्यभरात अधिकाधिक जागृती करण्याचाही निर्णय घेतला आहे. विद्यमान आयोगाची पहिली बैठक पार पडली. अध्यक्ष रंजिता पै, आमदार डिलायला लोबो यांच्यासह दामोदर कॉलेज, मडगावच्या डॉ. प्रीता मल्ल्या, पणजीतील धेंपे कॉलेजच्या प्रा. डॉ. वृंदा बोरकर, केपे येथील जनजागृती या स्वयंसेवी संस्थेच्या अऊणा धुरी, डॉ. ज्योती सावंत, केतकी परब गडेकर आणि अॅड. सिद्धी पारोडकर उपस्थित होत्या. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रंजिता पै यांची नेमणूक होऊन सहा महिने पूर्ण झाले, तरी आयोगावर इतर सदस्यांची नेमणूक करण्यात आली नव्हती. त्यामुळे आयोगाकडे 2020 पासून प्रलंबित असलेल्या सुमारे 322 प्रकरणांच्या सुनावण्या आता सुरू करण्यात येणार आहे.









