गोमंतकीय स्वयंसहाय्य गटांना डावलून बिगर गोमंतकीयांना प्रथम प्राधान्य
वार्ताहर / पणजी
कला आणि संस्कृती खात्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकोत्सव 2023’ महोत्सवात गोव्यातील व देशातील इतर राज्यांनाही सामावून घेतले जाते. यंदा मात्र स्टॉल वाटपादरम्यान सावळा गोंधळ झाला असून, बरीचशी आस्थापने (स्टॉल) बिगर गोमंतकीय व्यावसायिकांना दुप्पट-तिप्पट भावाने दिली असल्याचे गोमंतकीय व्यावसायिकांचे म्हणणे असून, लोकोत्सवात देण्यात आलेल्या स्टॉलची मोक्याची जागाही बाहेरील व्यावसायिकांनाच देण्यात आल्याची खंत गोमंतकीय व्यावसायिकांनी ‘तऊण भारत’शी बोलताना व्यक्त केली.
लोकोत्सवात देण्यात येणाऱ्या स्टॉलची विक्री ही संशयास्पदरित्या झाली आहे. स्टॉलवाटपादरम्यानही गोंधळ निर्माण झाला होता. दरवर्षी असाच विचित्र अनुभव येत असल्याचा आरोप गोमंतकीय स्वयंसहाय्य गटांनी केला आहे. गोमंतकीय व्यावसायिकांना शेवटच्या टप्प्यात स्टॉलचे वाटप करण्यात आल्याने त्यांना मोक्याच्या जागी स्टॉल थाटता आले नसल्याचे सांगितले. याचा फटका आता विक्रीवर होत आहे. कारण दर्शनी भागात बाहेरील राज्यातील व्यावसायिकांचे स्टॉल आहेत. तर गोमंतकीय व्यावसायिकांना पाठिमागे म्हणजे अडगळीच्या ठिकाणी स्टॉल दिल्याने ग्राहकांची गर्दी होत नसल्याने सामानाची विक्री होत नाही, असा आरोप स्वयंसहाय्य गटाच्या व्यावसायिकांनी केला आहे. अधिकाऱ्यांना हाताशी धरून दुप्पट पैसे देऊन ज्या ठिकाणी ग्राहकांची गर्दी होते अशा ठिकाणचे स्टॉल बिगरगोमंतकीयांना दिल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
प्रथम येणाऱ्यास प्रथम या तत्त्वावर (क्रमांकांना) स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार असवल्याचे यापूर्वीच अधिकाऱ्यांनी सांगितले होते. परंतु आदल्यादिवशीच काही स्टॉल्स पूर्वीच देण्यात आल्याचे गोमंतकीय विक्रेत्यांना दिसून आले. त्यामुळए कला आणि संस्कृती भवनात स्टॉल वाटप करताना बराच गोंधळ निर्माण झाला होता. गोमंतकीय स्वयंसहाय्य गटाच्या काही संस्थांनी संताप व्यक्त केला होता. कला अकादमीच्या परिसरातील खास उभारण्यात आलेल्या शामियानात अंदाजे दीडशे स्टॉल्स आहेत. त्यातील बरीच स्टॉल्स आता रिकामी पडलेली आहेत. काही अधिकाऱ्यांनी स्टॉल्स नसलेल्या बिगर गोमंतकीय विक्रेत्यांना गेटच्या (फाटक) बाजूलाच जागा उपलब्ध करून दुप्पत ते तिप्पट दर आकारल्याचा आरोप गोमंतकीय स्टॉल विक्रेत्यांनी केलेला आहे.
कला संस्कृती मंत्री लक्ष देतील का? कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी जरी बाहेरील राज्यातील उत्पादने या ठिकाणी विकली जावीत व दरवर्षीप्रमाणे यंदाही लोकोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. ही अपेक्षा रास्त असली तरी मूळ गोमंतकीय स्वयंसहाय्य गटाच्या स्टॉलधारकांवर अन्याय होत आहे, त्याकडे मंत्री गावडे लक्ष देतील का? असा प्रश्न गोमंतकीय स्टॉलधारकांनी उप]िस्थत केला आहे.









