उद्घाटन होताच फूटपाथवर अतिक्रमण
बेळगाव : बेळगाव रेल्वेस्थानक रोडवर स्टॉलधारकांनी पुन्हा एकदा आपले बस्तान बसविले आहे. फूटपाथवर 8 ते 9 स्टॉलधारकांनी आपली खोकी थाटली आहेत. रेल्वेस्थानकाचे उद्घाटन होताच पुन्हा स्टॉल सुरू झाल्याने कॅन्टोन्मेंटविरोधात नाराजी व्यक्त होत असून नागरिकांना फूटपाथऐवजी रस्त्यावरून ये-जा करावी लागत आहे. रेल्वेस्थानकाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी झाले. यासाठी रेल्वेस्टेशन रोडवरील सर्व फिरते विक्रेते व फूटपाथवरील स्टॉलधारकांना हटविले. यामुळे रस्त्याने काही दिवस का होईना मोकळा श्वास घेतला. परंतु उद्घाटन होताच दोन दिवसांत पुन्हा खोक्यांचे अतिक्रमण झाले. हेस्कॉम कार्यालयासमोर 7 ते 8 खोकी उभे करण्यात आली आहेत. कॅन्टोन्मेंट प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच फूटपाथवर कोणाचीही परवानगी न घेता स्टॉल उभे करण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.









