केंद्राने फेटाळले विधेयक : नीटपासून सूट देण्यास नकार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
तामिळनाडू सरकारने वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी अखिल भारतीय प्रवेश परीक्षा नीटला सातत्याने विरोध केला आहे. आता पुन्हा एकदा नीट वादावरून तामिळनाडूच्या एम.के. स्टॅलिन सरकारला केंद्र सरकारने झटका दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नीटपासून सूट आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी इयत्ता 12 वी गुणांचा वापर करण्याची अनुमती देण्याची तरतूद असलेल्या विधेयकाला फेटाळले आहे.
मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी राज्य विधिमंडळाकडून 2021 आणि 2022 मध्ये संमत करण्यात आलेल्या आणि तेव्हापासून केंद्र सरकारकडे प्रलंबित एक विधेयक फेटाळण्यात आल्याची माहिती विधानसभेला दिली आहे.
मागील वर्षी जून महिन्यात विधानसभेने सर्वसंमतीने एक प्रस्ताव संमत केला होता. यात केंद्र सरकारला नीट प्रणाली संपुष्टात आणणे आणि राज्यांना शालेय गुणांच्या आधारावर प्रवेश निश्चित करण्याची अनुमती देण्याचा आग्रह करण्यात आला होता.
नीटची तयारी करणाऱ्या तामिळनाडूच्या एका 21 वर्षीय विद्यार्थिनीने अलिकडेच आत्महत्या केली आहे. यामुळे राज्यात एक राजकीय वाद उभा ठाकला आहे. नीटशी संबंधित मृत्यूंसाठी द्रमुक जबाबदार असल्याचा आरोप अण्णाद्रमुकचे नेते ए. पलानिस्वामी यांनी केला आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन आणि त्यांच्या पक्षाचे नेते या विद्यार्थ्यांच्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत. केंद्रात संपुआचे सरकार असताना द्रमुकच्या नेत्यानेच नीट विधेयक संसदेत मांडले होते याची आठवण पलानिस्वामी यांनी करून दिली आहे.









