प्रस्तावाच्या विरोधात पूर्ण शक्तिनिशी लढण्याची गरज
वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे अध्यक्ष एम.के. स्टॅलिन यांनी ‘एक देश-एक निवडणूक’ विधेयकाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. या विधेयकाच्या विरोधात सर्व लोकशाहीवादी शक्ती आणि राजकीय पक्षांनी एकजूट व्हावे असे आवाहन स्टॅलिन यांनी सोमवारी केले आहे.
निवडणूक सुधारणांच्या आडून आणले गेलेल्या विधेयकाच्या विरोधात पूर्ण शक्तिनिशी लढण्याची गरज आहे. भारताची विविधता आणि राज्यघटनेला वाचविण्यासाठी पुढाकार घेतला जावा असे उद्गार स्टॅलिन यांनी काढले आहेत.
या विधेयकामुळे भारताचे राजकारण बदलून जाण्याचा धोका आहे. परंतु भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडे विधेयक संमत करविण्यासाठी पुरेसे संख्याबळ नाही. तरीही भाजप देशाच्या प्रगतीला प्रभावित करणाऱ्या मुख्य मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष हटविण्यासाठी हा प्रयत्न करत असल्याचा आरोप स्टॅलिन यांनी केला आहे.
भारत संघीय व्यवस्था विरोधी आणि अव्यवहारिक एक देश-एक निवडणूक विधेयकाला विरोध करणार आहे. हे विधेयक देशाला एकात्मिक शासन प्रणालीच्या दिशेने लोटणारे आहे. तसेच यामुळे भारताची विविधता आणि लोकशाही नष्ट होऊ शकते. केंद्रातील भाजप सरकार या विधेयकाला अध्यक्षीय निवडणूक प्रणालीच्या संचालनाच्या गुप्त उद्देशाच्या अंतर्गत पुढे नेऊ पाहत आहे, परंतु हे आमच्या राज्यघटनेच्या भावनेच्या विरुद्ध असल्याचा दावा स्टॅलिन यांनी केला.
विधेयक संमत झाल्यास हे देशाला अराजकता आणि अधिनायकवादात अडकण्यापासून रोखण्यासाठी आमच्या महान घटनाकारांकडून लागू करण्यात आलेले कायदेशीर नियंत्रण आणि संतुलन हटविणार आहे. याचबरोबर राज्याची निवडणूक स्वत:चे राजकीय महत्त्व गमावून बसेल आणि प्रादेशिक भावना आणि विविधता नष्ट होईल असे स्टॅलिन यांनी म्हटले आहे.








