बीडीएफए फुटबॉल स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित 14 वर्षाखालील बीडीएफए चषक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत शेवटच्या साखळी सामन्यातून सेंट झेवियर्सने केएलएसचा तर इस्लामियाने मदनी संघाचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
लव्हडेल स्कूलच्या स्पोर्टींग प्लॅनेट ऍस्ट्रो टर्फ फुटबॉल मैदानावर सेंट झेवियर्स संघाने केएलएस संघाचा 5-0 असा पराभव केला. दुसऱया मिनिटाला गौरव गोधवानीच्या पासवर तेजस राजने पहिला गोल केला. सहाव्या मिनिटाला सॅफ माडिवालेच्या पासवर गौरव गोदवानीने दुसरा गोल केला. दुसऱया सत्रात 30 व्या मिनिटाला तेजस राजच्या पासवर माहिब भडकलीने तिसरा गोल केला. 37 व्या मिनिटाला गौरव गोधवानीच्या पासवर सॅफ माडिवालेने चौथा गोल केला तर 40 व्या मिनिटाला माहिब भडकलीच्या पासवर महंमद अब्बास किल्लेदारने गोल करूनसेंट झेवियर्सला 5-0 असा विजय मिळवून दिला.
दुसऱया सामन्यात इस्लामिया संघाने मदनी संघाचा 2-1 असा पराभव केला. या सामन्यात चौथ्या मिनिटाला मावियाच्या पासवर अबिदुल्ला किल्लेदारने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. दुसऱया सत्रात 31 व्या मिनिटाला मदनी संघाच्या आझरच्या पासवर उमर मुजावरने गोल करून 1-1 अशी बरोबरी करीत सामन्यात रंगत निर्माण केली.
37 व्या मिनिटाला इस्लामियाच्या अबिदुल्लाच्या पासवर जाहीद लिंबूवालेने दुसरा गोल करून 2-1 ने आघाडी मिळवून दिली. त्यानंतर मदनी संघाने गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण ते अपयशी ठरले.
सेंट झेवियर्सचा मेरीजवर मोठा विजय
बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित 17 वर्षाखालील बीडीएफए चषक आंतरशालेय मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत सेंट झेवियर्स संघाने सेंट मेरीज संघावर 8-0 असा मोठा विजय मिळविला.
लव्हडेल स्कूलच्या मैदानावर मुलींच्या सामन्यात सेंट झेवियर्स संघाने सेंट मेरीजचा 8-0 असा पराभव केला. दुसऱया मिनिटाला मुईजा अक्रम पाशाने पहिला गोल केला. 12 व 13 व्या मिनिटाला अल्सा बोरजेसने सलग दोन गोल करून 3-0 ची आघाडी मिळवून दिली. 14 व्या मिनिटाला मंजुशा पाटीलने चौथा गोल केला.
18 व्या मिनिटाला अल्सा बोरजेसने पाचवा गोल करून 5-0 ची आघाडी मिळवून दिली. दुसऱया सत्रात 26 व्या मिनिटाला तनुशा सालगुडेने सहावा गोल केला तर 27 व 30 व्या मिनिटाला मुईजा अक्रम पाशाने सलग दोन गोल करून 8-0 असा एकतर्फी विजय निश्चित केला.









