क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
सक्षम स्पोर्ट्स एरियाना आयोजित आंतरशालेय 14 वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सेंट झेवियर संघाने संजय घोडावत संघाचा 3-0 असा पराभव करून सक्षम स्पोर्ट्स चषक पटकाविला. उत्कृष्ट खेळाडु चेतन (संजय घोडावत) तर उत्कृष्ट गोल रक्षक उझेर (सेंट झेवियर) याला गौरविले.
टिळकवाडी येथील सक्षम स्पोर्ट्स एरियाना मैदानात आंतर शालेय 14 वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेच्या झालेल्या पहिला उपांत्यच्या सामन्यात संजय घोडावत संघाने एमव्हीएम संघाचा 2-1 असा गोल फरकाने पराभव केला. या सामन्यात 7 व्या मिनिटाला घोडावतच्या चेतनच्या पासवर प्रज्वलने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. त्याला एमव्हीएमच्या प्रीतमने बचाव फळीला चकवत गोल करून 1-1 अशी बरोबरी करत सामन्यात रंगत निर्माण केली. 17 व्या मिनिटाला घोडावतच्या प्रज्वलच्या पासवर चेतनने गोल करून 2-1 अशी महत्त्वाची आघाडी मिळवून दिली.
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सेंट झेवियरने जैन हेरिटेजचा 1-0 असा पराभव केला. या सामन्यात 12 व्या मिनिटाला झुबेरच्या समर्थच्या पासवर अर्कानने गोल करून 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर जैन हेरिटेजने गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले पण त्यांना यश आले नाही. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात जैन हेरिटेजने एमव्हीएमचा टायब्र्रेकर मध्ये 3-1 पराभव करून तिसरे स्थान मिळवले.
अंतिम सामन्यात सेंट झेवियर्सने संजय घोडावत संघाचा 3-0 असा पराभव केला. या सामन्यात तिसऱ्या मिनिटाला अर्कानच्या पासवर समर्थ भंडारीने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. नवव्या मिनिटाला अर्कान बडेघर च्या पासवर समर्थ भंडारीने दुसरा गोल केला. तर 17 व्या मिनिटाला संजय घोडावतच्या खेळाडूने चेंडू बाहेर मारण्याच्या नादात चेंडू सरळ आपल्या गोल मुकात मारून स्वयंचित गोल करून दिला. सेंट झेवियर्सने 3-0 अशी महत्त्वाची आघाडी मिळवून दिली.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे पुरस्कृर्ते आकाश पाटील, विजय रेडेकर, किरण चव्हाण, निखिल कांबळे आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या सेंट झेवियर्स, उपविजेत्या संजय घोडावत, तिसरा क्रमांक पटकाविलेल्या जैन हेरिटेज संघाला चषक देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट डिफेंडर समर्थ भंडारी ( सेंट झेवियर), उत्कृष्ट फॉरवर्ड प्रज्वल ( संजय घोडावत), उत्कृष्ट गोल रक्षक उझेर ( सेंट झेवियर), स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू चेतन (संजय घोडावत) यांना चषक घेऊन गौरविण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सक्षम स्पोर्ट्स एरियानाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्र्रम घेतले.









