प्रतिनिधी /पणजी
कॉलेजमधील नुकत्याच झालेल्या गोंधळासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सेंट झेविअर कॉलेज प्रशासनाला जबाबदार धरले असून, विद्यार्थी परिषद त्वरित समाविष्ट करण्याची मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली. महाविद्यालयाला वारंवार विनंती करूनही विद्यार्थी परिषदेच्या शपथविधी घेण्याबाबत टाळाटाळ केली असल्याचे महाविद्यालयाचे जनरल सेक्रेटरी साहील महाजन यांनी सांगितले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पणजीतील कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला अभाविपदेच्या गोवा राज्य संयोजक धनश्री मांद्रेकर, उत्तर गोवा संयोजक सुदीप नाईक, म्हापसा शहर सचिव विनय राऊत, सर्वेश तळवडकर, आकाश नाईक उपस्थित होते.
महाजन यांनी सांगितले की, महाविद्यालयाच्या सरचिटणीसपदी निवडून येऊनही सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या प्रशासनाने शपथविधी समारंभ घेण्यास कायम टाळाटाळ केली. याविषयी महाविद्यालयाचे प्राचार्य, व्यवस्थापक यांना वारंवार आठवण करून देऊनही त्यांच्याकडून कोणतीच हालचाल केली जात नव्हती. निवडणूक होऊ 75 दिवस उलटूनही सेंट झेवियर्सच्या प्रशासकाने जाणीवपूर्वक विद्यार्थी परिषद स्थापना उशीर केला आहे. 8 नोव्हेंबर 2022, त्यानंतर 3 जनेवारी व पुन्हा 5 जानवेवारी 2023 या दिवशीही आम्ही विद्यार्थी परिषद तातडीने सुरू करण्याबाबत दिवस निश्चित करा, असे सांगून आम्हाला दाद दिली नाही. त्यामुळे आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलनाचा निर्णय घेतल्याचे महाजन म्हणाले. आमची मागणी केवळ महाविद्यालयात विद्यार्थी परिषद तातडीने सुरू करावी, ही आहे. महाविद्यालय प्रशासनाने याकडे लक्ष देऊन ही मागणी त्वरित पूर्ण करावी, असेही महाजन म्हणाले.
महाविद्यालयात निर्माण झालेला गोंधळ हा व्यवस्थापनामुळे झालेला आहे. आम्ही केवळ आमच्या मागणीसाठी एकत्र आलो होतो, असे पत्रकार परिषदेत साहील महाजन यांनी सांगितले.









