एम.व्ही.हेरवाडकर संघाला उपविजेतेपद, प्रेम रेड्डीला उकृष्ट खेळाडूचा तर श्रेयेश भेकणेला उत्कृष्ट गोलरक्षकाचा बहुमान
बेळगाव : पोलाईट्स ऑफ बेळगाव वर्ल्डवाईडतर्फे ’सेंट पॉल्स हायस्कूलच्या सहकार्याने 56 व्या फादर एडी स्मृतीचषक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बलाढ्या सेंट पॉल्स संघाने एम. व्ही. हेरवाडकर संघाचा 4-0 असा पराभव करुन 56 वा फादर एडी चषक पटकाविला. प्रेम रेड्डी याला स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू तर श्रेयेश भेकणे याला उत्कृष्ट गोलरक्षक म्हणून गौरविण्यात आले. सेंट पॉल्स पदवीपूर्व महविद्यालयाच्या मैदानावर घेण्यात आलेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सेंट पॉल्सने अंगडी इंटरनॅशनल
स्कूल संघाचा 3-0 असा पराभव केला. या सामन्यात पहिल्या सत्रात दोन्ही संघाला गोल करण्यात अपयश आले. दुसऱ्या संघात 34 व्या मिनिटाला सेंट पॉल्सच्या निकोलोस फर्नांडीसने पहिला गोल केला. 37 व्या मिनिटाला ईशान देवगेकरने दुसरा गोल केला तर खेळ संपण्यास एक मिनिट बाकी असताना सेंट पॉल्सच्या इब्राहीम पठाणने गोल करुन 3-0 ने विजय मिळवून दिला. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात एम. व्ही. हेरवाडकर संघाने सर्वोदय खानापूरचा 3-0 असा पराभव केला. अंतिम सामना सेंट पॉल्स व हेरवाडकर यांच्यात झाला. या सामन्याचे उद्घाटन बेळगावचे पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, आमदार राजू सेठ, महानगरपालिकेच्या उपायुक्त लक्ष्मी निपाणीकर, सेंट पॉल्सचे मुख्याध्यापक फादर सायमन फर्नांडीस आदी मान्यवरांच्या हस्ते दोन्ही संघांच्या खेळाडूंची ओळख करुन झाले.
या सामन्यात पहिली 15 मिनिटे दोन्ही संघाने आक्रमक चढाया केल्या. 16 व्या मिनिटाला निकोलोस फर्नांडीसच्या पासवर प्रेम रेड्डीने पहिला गोल करुन 1-0 ची आघाडी मिळवून दिली. 20 व्या मिनिटाला हेरवाडकरच्या ऋषभ बल्लाळने गोल करण्याची नामी संधी दवडली. 27 व्या मिनिटाला प्रेम रेड्डीच्या पासवर स्वयंम नाईकने दुसरा गोल करुन 2-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात हेरवाडकर संघाने आक्रमक चढाया सुरू केल्या. 33 व्या मिनिटाला ऋषभ बल्लाळ व 35 व्या मिनिटाला वेदांत पाटील यांनी मिळालेल्या गोल करण्याच्या संधी दडवल्या. मात्र सेंट पॉल्सने आपल्या छोट्या पासद्वारे आक्रमक चढाया सुरू केल्या. 40 व्या मिनिटाला निकोलोस फर्नांडीसच्या पासवर स्वयंम नाईकने तिसरा गोल केला. खेळ संपण्यास एक मिनिट बाकी असताना स्वयंम नाईकच्या पासवर प्रेम रेड्डीने बचाव फळीला चकवत चौथा गोल करुन 4-0 फरकाने सेंट पॉल्सला विजय मिळवून दिला. या सामन्यात हेरवाडकरने गोल करण्याच्या अनेक संधी दडवल्याने त्यांना पराभवास सामोरे जावे लागले.
सामन्यानंतर पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, आमदार राजू सेठ, महानगरपालिकेच्या उपायुक्त लक्ष्मी निपाणीकर, सेंट पॉल्सचे मुख्याध्यापक फादर सायमन फर्नांडीस, बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव अमित पाटील, एम. प्रभू, अनिकेत कस्ट्रिया, जीमी सिंग, विनायक धामणेकर आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या सेंट पॉल्स संघाला व उपविजेत्या एम. व्ही. हेरवाडकर संघाला आकर्षक चषक, सर्व खेळाडूंना चषक, टी-शर्ट व प्रमाणपत्रे देवून गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट संघ ज्ञान प्रबोधन मंदिर, उत्कृष्ट प्रशिक्षक विनायक नाईक हेरवाडकर, उगवता खेळाडू आर्यन भिसे (अंगडी), उत्कृष्ट गोलरक्षक श्रेयेश भेकणे (एमव्हीएम), स्पर्धेतील सर्वाधिक गोल करणारा स्वयंम नाईक सेंट पॉल्स
तर स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू प्रेम रेड्डी सेंट पॉल्स यांना चषक देवून गौरविण्यात आले. या अंतिम सामन्यात पंच म्हणून अभिषेक शेरेकर, पवन देसाई, समर्थ बांदेकर, फिरोज शेख, अमिन पिरजादे, रॉयस्टिन गोम्स, विष्णू दावणेकर, कृष्णा मुचंडी,ओमकार शिंदोळकर यांनी काम पाहिले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परेश मुरकुटे, इम्रान सनदी, तन्वीर अस्तिवाले, किरण निपाणीकर, दिनेश पतकी, प्रशांत शहापूरकर, रायमन गौडा, किशोर कारेकर, अजय पाटील, संतोष दरेकर, श्रीकांत आजगावकर, अनिल पाटील, युवराज कदम, विनायक, विशाल हन्नीकेरी, संतोष गावडे, अभिमन्यु दागा, राजन गुलबानी, सादिक, उदय, प्रविण, शेल्डन यांनी विशेष परिश्रम घेतले.









