वसुंधरा चव्हाण उत्कृष्ट खेळाडू, सारा सौदागर उत्कृष्ट गोलरक्षक
बेळगाव : सक्षम स्पोर्टस अॅरेनॉज आयोजित मुलींच्या फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सेंट जोसेफने सेंट झेविअर्सचा टायब्रेकरमध्ये 2-0 असा पराभव करून सक्षम चषक पटकाविला. वसुंधरा चव्हाण उत्कृष्ट खेळाडू, सारा सौदागर उत्कृष्ट गोलरक्षक म्हणून गौरविण्यात आले. टिळकवाडीच्या सक्षम स्पोर्टस अॅरेनॉजच्या टर्फ फुटबॉल मैदानावर आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन लोटस कौंटीचे प्रोजक्ट हेड साई रामलिंग यांच्या हस्ते करण्यात आले. पहिल्या सामन्यात सेंट झेविअर्सने सेंट जोसेफचा 1-0 असा निसटता पराभव केला. दुसऱ्या सामन्यात सेंट झेविअर्सने मराठी विद्यानिकेतचा 5-0 असा पराभव केला. झेविअर्सतर्फे श्रावणी सुतारने 2, किंजल जाधव, वसुंधरा चव्हाण, जान्वी चव्हाण यांनी प्रत्येकी 1 गोल केला तर या सामन्यामधील उत्कृष्ट खेळाडू म्हणून श्रावणी सुतारला देण्यात आले. दुसऱ्या सामन्यात संतिबस्तवाड अ ने डीपी संघाचा 1-0 असा पराभव केला.
या सामन्यात मेघा कोदात्तीने एकमेव गोल केला. मेघाला उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. चौथ्या सामन्यात सेंट झेविअर्सने शेख सेंट्रलचा 2-0 असा पराभव केला. या सामन्यात मयुरीने 2 गोल केले आणि तिलाच सामनावीर पुरस्कार देण्यात आला. पाचव्या सामन्यात संतिबस्तवाड अ संघाने लव्हडेल संघाचा 5-0 असा पराभव केला. संतिबस्तवाडच्या अन्नपूर्णाने 3,पल्लवी व मेघा यांनी प्रत्येकी 1 गोल केला. सहाव्या सामन्यात सेंट जोसेफने शेखचा 3-0 असा पराभव केला. जोसेफतर्फे रोहिणीने 2 तर रियाने 1 गोल केला. रोहिणीला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. सातव्या सामन्यात डी पी व लव्हडेल यांच्यात सामना झाला. हा सामना 0 बरोबरीत राहिला. आठव्या सामन्यात सेंट झेविअर्सने संतिबस्तवाड ब चा 4-0 असा पराभव केला. झेविअर्सतर्फे श्रावणी, किंजल, साक्षी व वसुंधरा चव्हाण यांनी प्रत्येकी 1 गोल केला. पहिल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात सेंट जोसेफ संघाने संतिबस्तवाड संघाचा 2-1 असा पराभव केला.
जोसफतर्फे रोहिणी व गौतमी यांनी प्रत्येकी 1 गोल केला तर संतिबस्तवाडतर्फे रियाने गोल केला. दुसऱ्या उपांत्यफेरीच्या सामन्यात सेंट झेविअर्स अ ने ब चा 2-0 असा पराभव केला. या सामन्यात श्रावणी व वसुंधरा यांनी प्रत्येकी 1 गोल केला. साक्षीला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. सायंकाळी झालेल्या अंतिम सामन्यात सेंट जोसेफने सेंट झेविअर्सचा टायब्रेकरमध्ये 2-1 अशा गोलफरकाने पराभव करून विजेतेपद पटकाविले. निर्धारीत वेळेत दोन्ही संघांनी 1-1 अशी बरोबरी केली होती. झेविअर्सतर्फे वसुंधरा चव्हाणने गोल केला तर जोसेफतर्फे मयुरीने गोल केला.या सामन्यात पंचांनी टायब्रेकर नियमाचा वापर केला. त्यामध्ये जोसेफने 2-1 असा पराभव केला. जोसेफतर्फे रोहिणीने टायब्रेकरमध्ये गोल केला. प्रमुख पाहुणे वसंत हेब्बाळकर व विजय मठपती यांच्या हस्ते विजेत्या सेंट जोसेफ व उपविजेत्या सेंट झेविअर्स संघाला प्रमाणपत्र देण्यात आले. उत्कृष्ट डिफेंडर रिया वाळके जोसेफ, उत्कृष्ट गोलरक्षक सारा सौदागर जोसेफ, उत्कृष्ट फारवर्ड साक्षी चिटगी झिविअर्स, उत्कृष्ट खेळाडू वसुंधरा चव्हाण झेविअर्स यांना चषक देऊन गौरविण्यात आले.









