अस्मिता खेलो इंडिया मुलींच्या फुटबॉल स्पर्धा
बेळगाव : कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना मान्यता प्राप्त बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित अस्मिता खेलो इंडिया मुलींच्या 16 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेत उद्घाटन दिवशी सेंटजोसेफ ऑर्फानिंग संघाने बीटा एफसीचा 5-0, बीडब्ल्यूएफएने संत मीराचा 2-0 तर एमएसडीएफने सेंट जोसेफचा 5-0 असा पराभव करुन विजयी सलामी दिली. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस आयुक्त येडा मार्टिन मार्बन्यांग, साईचे अधिकृत अधिकारी राम बुडकी, बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष पंढरी परब, उपाध्यक्ष गोपाळ खांडे, लेस्टर डिसोजा, सचिव अमित पाटील, अल्लाबक्ष बेपारी, एस. एस. नरगोडी, प्रमुख पंच रॉस्टीन जेम्स, फिरोज शेख, रवी चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते. दोन्ही संघांच्या खेळाडूंची ओळख करुन व चेंडू लाथाडून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
पहिल्या सामन्यात सेंट जोसेफ ऑर्फानिंग संघाने बीटा एफसीचा 5-0 असा पराभव केला. पहिल्याच मिनिटाला सेंट जोसेफच्या अंकिताच्या पासवर मेघाने पहिला गोल करुन 1-0 ची आघाडी मिळविली. पाचव्या व सतराव्या मिनिटाला स्नेहा सारापुरच्या पासवर अन्नपूर्णाने सलग दोन गोल करुन 3-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 25 व्या मिनिटाला अन्नपूर्णाच्या पासवर स्नेहा सारापुरने चौथा गोल केला. 27 व्या मिनिटाला मेघाच्या पासवरती अंकिता जी.ने पाचवा गोल करुन 5-0 ची आघाडी मिळवून दिली. या सामन्यात बीटा संघाला गोल करण्यात अपयश आले.
दुसऱ्या सामन्यात बीडब्ल्यूएफए संघाने संतमीरा एफसीचा 2-0 असा पराभव केला. या सामन्यात पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी बरेच प्रयत्न केले. मिळालेल्या संधीही वाया दवडल्याने पहिल्या सत्रातील गोल फलक कोराच राहिला. दुसऱ्या सत्रात 28 व्या मिनिटाला युक्ता पाटीलच्या पासवर गौतमीने गोल करुन 1-0 ची आघाडी मिळवून दिली. 41 व्या मिनिटाला गौतमीच्या पासवरती युक्ता पाटीलने गोल करुन 2-0 ची महत्त्वाची आघाडी मिळवून दिली. या सामन्यात संत मीरा एफसीला गोल करण्यात अपयश आले.
तिसऱ्या सामन्यात एमएसडीएफ संघाने सेंट जोसेफचा 5-0 असा पराभव केला. सामन्याच्या चौथ्या मिनिटाला साक्षी चिटगाच्या पासवर वसुंधरा चव्हाणने पहिला गोल केला. 9 व 13 व्या मिनिटाला वसुंधरा चव्हाणच्या पासवरती श्रावणी सुतारने दुसरा गोल करुन 3-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 26 व्या मिनिटाला साक्षी चिटगाच्या पासवर वसुंधरा चव्हाणने चौथा गोल करुन 38 व्या मिनिटाला श्रावणी सुतारच्या पासवरती साक्षी चिटगाने पाचवा गोल करुन 5-0 ची महत्त्वाची आघाडी मिळवून दिली.









